LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

दिव्यांगांना शासकीय लाभासाठी यूडीआयडी कार्ड अनिवार्य

भंडारा : शासनाच्या नव्या आदेशानुसार दिव्यांग व्यक्तींना मिळणा-या शासकीय योजनांचा लाभ आणि दिव्यांग पेन्शन घेण्यासाठी यूडीआयडी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या दिव्यांग व्यक्तीकडे यूडीआयडी कार्ड नाही, त्यांनी ते तयार करुन घ्यावे, असे आवाहन भंडारा तहसीलदारांनी केले आहे.
तहसील कार्यालयाकडून पात्र दिव्यांग लाभार्थ्यांची यादी संबंधित तलाठ्यांकडे आली आहे. या यादीत ज्या दिव्यांग व्यक्तीची नावे आहेत त्यांनी आपल्या दिव्यांग प्रमाणपत्राची यूडीआयडी पोर्टलवर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. यासोबतच दिव्यांग प्रमाणपत्राला आधार कार्ड संलग्नीकरण करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. तहसील प्रशासनाच्या माहितीनुसार, २५ मार्चपर्यंत सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात येऊन यूडीआयडी कार्डचे ई-केवायसी, आधार प्रमाणीकरण तसेच डीबीटी पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. यासाठी तहसील कार्यालयात विशेष व्यवस्था करण्यात आली असून लाभार्थ्यांनी विलंब न करता आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयात उपस्थित राहावे. असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, ज्या दिव्यांग व्यक्तीकडे अद्याप यूडीआयडी कार्ड उपलब्ध नाही, त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक भंडारा यांच्या कार्यालयात जाऊन ते तयार करुन घ्यावे, असेही प्रशासनाने कळविले आहे. निश्चित मुदतीत युडीआयडी कार्ड तयार न केल्यास किंवा ई-केवायसी व आधार संलग्नीकरणाची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास दिव्यांग पेन्शन व इतर शासकीय लाभ बंद होण्याची शक्यता असल्याने दिव्यांग लाभार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *