LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

गुजरात-छत्तीसगडमधून ७ शूटर जेरबंद; मुख्य सूत्रधार अद्याप पसार!

नगरसेवक शुभम मोटघरे फायरिंगमागे ‘सुपारी’चे भयानक कारस्थान
नागपूर :
नागपूरचे नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर झालेल्या भीषण गोळीबार प्रकरणाचा पडदाफाश करण्यात गुन्हे शाखा पोलिसांना मोठे यश आले आहे. राजकीय व सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या या गुन्ह्यामागे ‘सुपारी’चे मोठे कारस्थान असल्याचे तपासात उघड झाले असून, नागपूर गुन्हे शाखेने गुजरात आणि छत्तीसगडमध्ये धाडी टाकून सात सराईत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत या धडक कारवाईची माहिती दिली.
२६ ऑगस्टच्या मध्यरात्री नगरसेवक मोटघरे यांच्या घरावर विना नंबरप्लेटच्या दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांपैकी एकाने थेट गोळी झाडली होती. ही गोळी गॅलरीच्या रेलिंगच्या काचेला लागून भगदाड पडले होते. या गंभीर घटनेनंतर भांडेवाडी पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांनी ३० ते ४० गुन्हेगारी टोळ्यांमधील सुमारे २०० गुन्हेगारांची कसून चौकशी केली. तब्बल ५०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आणि एआय (AI) तंत्रज्ञानाचा अत्यंत प्रभावी वापर करून पोलिसांनी आरोपींचा माग काढला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अंकुश झनक तोमसकर, अमित मधुकर ठाकरे, रिषभ उर्फ छोट्या विशाल नागदेवे, रोमित उर्फ पुल्ल्या मुनेश्वर वाहने, कांचा उर्फ ऋषभ भगवती पैथल, केतन दुर्गाप्रसाद माटे आणि कार्तिक बबलू तोमसकर यांचा समावेश आहे. या सर्व आरोपींना नागपुरात आणण्यात आले असून न्यायालयाने त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात समोर आले की, हा संपूर्ण कट कुख्यात मटकाकिंग बाबाजीच्या ऑफिसमध्ये शिजला होता. छोट्या उर्फ ऋषभ नागदेवे दुचाकी चालवत होता, तर अंकुशने थेट फायरिंग केली होती.
सूत्रानुसार, ४६ गंभीर गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुंड ‘फल्ली’ या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचा दाट संशय आहे. शुभम मोटघरे हे फल्ली आणि त्याच्या साथीदारांच्या एमडी (MD) ड्रग्ज तस्कराची बातमी पोलिसांना देत असल्याच्या संशयातून त्यांना घाबरवण्यासाठी आणि ‘चमकवण्यासाठी’ ५० हजार रुपयांची सुपारी देण्यात आली होती. आरोपींच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप चॅट पोलिसांच्या हाती लागले असून सुपारीचा हा व्यवहार उघड झाला आहे. या संघटित गुन्हेगारीविरोधात ‘मकोका’ (MCOCA) अंतर्गत कडक कारवाई केली जाणार असून, तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एसीपी वैभव जाधव व त्यांच्या पथकाला २५ हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *