धान उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ बोनस द्या; दिवाळीपूर्वी खरेदी केंद्र सुरू करा : खा. प्रफुल पटेल
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक मुख्यमंत्र्यांकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ नेण्याचा निर्धार
मुंबई/गोंदिया : गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील संकटात सापडलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तात्काळ बोनस जाहीर करावा, तसेच आगामी दिवाळी सणापूर्वी सर्व शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करून सीएमआर भरडाई केलेल्या धानाची तातडीने उचल करावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा खासदार प्रफुल पटेल यांनी केली आहे. नागपूर विभागातील किमान आधारभूत किंमत खरेदी योजना, सीएमआर भरडाई, साठवणूक आणि धान उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत मंत्रालयात अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, त्या वेळी ते बोलत होते. पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा आणि लगतच्या जिल्ह्यांतील मुख्य पीक असलेल्या धान पिकाच्या खरेदी व साठवणुकीबाबत दरवर्षी अनेक अडचणी निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत खा. प्रफुल पटेल यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर भूमिका मांडली. “विधानसभा अधिवेशनादरम्यान राज्य शासनाने धान उत्पादकांना बोनस देण्याचे स्पष्ट आश्वासन दिले होते. त्यामुळे यंदाही शेतकऱ्यांना हक्काचा बोनस मिळायलाच हवा. यासाठी या भागातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी मिळून मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतील आणि बोनस मंजूर करून घेण्यासाठी संयुक्तपणे आग्रह धरतील,” असा निर्धार खा. पटेल यांनी व्यक्त केला.ई-पीक पाहणीतील तांत्रिक अडचणी दूर कराशेतकऱ्यांचे धान खरेदी केंद्रांवर वेळेत विकले जावे यासाठी ई-पीक पाहणी नोंदणी प्रक्रियेतील सर्व तांत्रिक त्रुटी तातडीने दूर कराव्यात, जेणेकरून एकाही शेतकऱ्याची अडचण होणार नाही. याशिवाय, महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाच्या (टीडीसी) माध्यमातून २००१ ते २०१४ या कालावधीत खरेदी केलेल्या धानाचे संस्थांना मिळणारे प्रलंबित कमिशन शासनाने त्वरित अदा करावे, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.’बीम’ पोर्टल सुरू करून गोदामांची क्षमता वाढवा : खा. राजेंद्र जैनया बैठकीस ऑनलाईन माध्यमातून सहभागी झालेले खासदार राजेंद्र जैन यांनी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ तातडीने देण्याची मागणी लावून धरली. तसेच, शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी वापरले जाणारे ‘बीम’ (BEAM) पोर्टल वारंवार बंद पडत असल्याने शेतकरी त्रस्त असून ते सुरळीत सुरू करण्यात यावे. धान साठवणुकीसाठी पुरेशी गोदामे उपलब्ध नसल्याने दरवर्षी तब्बल ७० टक्के धान उघड्यावर पडून राहते, त्यामुळे गोदामांची साठवणूक क्षमता तातडीने वाढवावी, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.या बैठकीत धान खरेदी संस्थांच्या अडचणी आणि सीएमआर भरडाईच्या प्रक्रियेवर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. बैठकीला माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले, आमदार राजूभाऊ कारेमोरे यांच्यासह पूर्व विदर्भातील अनेक प्रमुख लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

