LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

नागपुरात डीजे बंदीवरून राजकीय संघर्ष पेटला! पोलिसांचे कडक नियम; बेस साउंड आणि हाय-कॅपॅसिटी सिस्टीमवर पूर्ण बंदी!

गणेशोत्सवात डीजे अन् डॉल्बीवर पोलिसांचा कडक पहारा; नियम मोडल्यास होणार थेट कारवाई!
नागपूर :
नागपूर शहरात डीजे आणि साऊंड सिस्टीमच्या वापरावर पोलिसांनी लादलेले निर्बंध कायम असून, यावरून आता राजकीय वाद पेटण्यास सुरुवात झाली आहे. नागरिकांना सर्वाधिक त्रासदायक ठरणारे, प्रचंड कंपन (व्हायब्रेशन) आणि ध्वनी प्रदूषण निर्माण करणाऱ्या ‘बेस साऊंड’वर (Base Sound) पोलिसांनी पूर्णपणे बंदी कायम ठेवली आहे. पोलीस आयुक्तांनी शुक्रवारी स्पष्ट केले की, टॉप आणि मिडल साऊंड सिस्टीमवरही पूर्ण सूट दिलेली नाही; केवळ ठरवून दिलेल्या मर्यादेतच त्यांचा वापर करता येईल. मात्र, या बंदीवरून भाजप नेत्यांमध्येच मतभेद समोर आले असून राजकीय टकराव वाढताना दिसत आहे.
माजी आमदार संदीप जोशी यांनी डीजेच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजासह लेझर लाईट्सवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यानुसार पोलिसांनी ३ सप्टेंबर ते १ नोव्हेंबरदरम्यान डीजेच्या वापरावर बंदी लागू केली आहे. मात्र, या निर्णयानंतर भाजपचे आमदार प्रवीण दटके, शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांसह इतर नेत्यांनी डीजेवर पूर्ण बंदी न घालण्याची मागणी करत पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावर उत्तर देताना पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले की, ध्वनी प्रदूषण रोखणे आणि नागरिकांना होणारा त्रास वाचवणे हाच यामागील मुख्य उद्देश आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी कानठळ्या बसवणाऱ्या साऊंड सिस्टीमवर कडक पावले उचलली आहेत. डॉल्बी साऊंड, प्लाझ्मा साऊंड, प्रेशर-मिड आणि वाहनांमध्ये केलेले बेकायदेशीर मॉडिफिकेशन यांवर पूर्णपणे बंदी असेल. तसेच, मिरवणुकीत लेझर आणि बीम लाईटच्या वापरावरही रोख लावली आहे, कारण यामुळे वाहन चालकांची दृष्टी बाधित होऊन अपघाताचा धोका असतो. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत हे कडक आदेश जारी करण्यात आले आहेत.
पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, हे नियम केवळ सणांपुरते मर्यादित नसून वर्षातील ३६५ दिवस सर्व धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना समान रीतीने लागू राहतील. सामान्य साऊंड सिस्टीमवर पूर्ण बंदी नसली तरी ध्वनी प्रदूषण नियम, २००० नुसार निश्चित डेसिबल मर्यादेचे पालन करणे बंधनकारक राहील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा प्रशासनाने दिला आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *