वर्धा जिल्ह्यात भीषण विचित्र अपघात : २ जण ठार, २ गंभीर जखमी
डंपर, आयशर आणि दोन ट्रॅक्टरची एकमेकांना धडक खरांगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
वर्धा : खरांगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारच्या पहाटे चार वाहनांचा भीषण विचित्र अपघात झाला. डंपर, आयशर आणि विना क्रमांकाच्या दोन ट्रॅक्टरमध्ये झालेल्या या तिहेरी धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की वाहनांचा चक्काचूर झाला असून रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. सविस्तर वृत्त असे की, खंभीत/बेलोरा येथील रहिवासी गजानन नांदने (वय ३५) हे त्यांचे सहचालक राजकुमार नचाने (वय २६, रा. हिवरखेड, मोर्शी, अमरावती) यांच्यासोबत परतवाड्याहून डंपर घेऊन येत होते. पहाटे सुमारे ५:३० वाजता वर्धा मार्गावरील तळेगाव रघुजीपासून सुमारे १ किमी अंतरावर असताना, समोरून खरांगणाच्या दिशेने विना क्रमांकाचे दोन ट्रॅक्टर येत होते. याच दरम्यान ट्रॅक्टरच्या मागून भरधाव वेगात आलेल्या आयशर वाहनाचा चालक गुल्लुभाई हसन (मध्य प्रदेश) याने पुढे जाण्याच्या नादात ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, निष्काळजीपणा व भरधाव वेगामुळे आयशरने थेट समोरून येणाऱ्या डंपरला जोरदार धडक दिली. धडक बसताच आयशर उलटला आणि दोन्ही ट्रॅक्टरही या अपघातात जाऊन धडकले. या भीषण अपघातात डंपरचा सहचालक राजकुमार नचाने आणि ट्रॅक्टरचालक शशिकांत सावरकर (वय ४०, रा. वडगाव (कला), ता. सेलू) हे दोघे गंभीर जखमी झाले, ज्यांचा नंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच आयशरमधील अजनील हसन (गुल्लु हसन) यांच्यासह इतर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातामध्ये डंपर, आयशर आणि दोन्ही ट्रॅक्टरचे प्रचंड नुकसान झाले आहे. क्रेनच्या सहाय्याने वाहतूक पूर्ववत सुरूघटनेची माहिती मिळताच खरांगणा पोलीस व परिसरातील स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने वाहनातून बाहेर काढून शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर क्रेन बोलावून अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. गजानन नांदने यांच्या तक्रारीवरून खरांगणा पोलिसांनी आयशर चालक गुल्लुभाई हसन याच्याविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

