इन्स्टाग्रामवरील वादातून वाढदिवसाच्या पार्टीत रक्तरंजित थरार! ढाणकीत तलवारी-चाकूने जीवघेणा हल्ला;
तिघे गंभीर जखमीफक्त एका ‘इमोजी’मुळे उसळला भडका; मुख्य आरोपी धम्मदीप काळबांडेसह १३ जणांवर गुन्हा; ५ विधीसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश
उमरखेड (ढाणकी/ यवतमाळ) : सोशल मीडियावरील किरकोळ स्टेटस आणि त्यावर पाठवलेल्या एका इमोजीवरून झालेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी वाढदिवसाच्या पार्टीत धारदार चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना ढाणकी येथील सहारा पार्क येथे घडली आहे. या भीषण हल्ल्यात तीन तरुण गंभीर जखमी झाले असून ते सध्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी बिटरगाव पोलिसांनी मुख्य आरोपी धम्मदीप काळबांडे याच्यासह १३ जणांविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला असून यामध्ये ५ अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.सलाईन लावलेल्या फोटोवर ‘स्माईल’ पाठवणे पडले महाग!याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, सोमवार, ८ जून रोजी एका विधीसंघर्षग्रस्त बालकाने त्याच्या इन्स्टाग्राम आयडीवर हाताला सलाईन लावल्याचे एक स्टेटस ठेवले होते. या स्टेटसवर हर्षद खटके (वय १८, रा. ढाणकी) याने स्माईलची इमोजी पाठवली. यावरून दोघांमध्ये सोशल मीडियावर जोरदार ऑनलाईन वाद झाला. या वादाचा राग मनात धरून आरोपींनी पुढील कट रचला.त्याच दिवशी रात्री ८:३० वाजताच्या सुमारास हर्षद आणि त्याचे मित्र ढाणकी येथील सहारा पार्क येथे गोलू गिरी याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जमले होते. दुपारी झालेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी मुख्य आरोपी धम्मदीप संजय काळबांडे याच्यासह १० जण चार दुचाकींवरून त्या ठिकाणी आले. त्यांनी हर्षदसोबत वाद घालण्यास सुरुवात केली आणि वाद वाढल्याने आरोपींनी त्यांच्या आणखी तीन मित्रांना तेथे बोलावून घेतले.यावेळी हर्षदने दुपारच्या प्रकरणावरून त्यांची माफीही मागितली, परंतु आरोपी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आरोपी सूरज काळबांडे याने हर्षद व त्याच्या मित्राला कानाखाली मारली. हा वाद सोडवण्यासाठी गोलू गिरी (वय १८) हा मध्ये पडला असता, मुख्य आरोपी धम्मदीपने कमरेचा धारदार चाकू काढून थेट गोलूच्या मानेवर वार करून जीवघेणा हल्ला केला. गोलू गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.मित्राला वाचवायला गेले अन्…रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गोलूला वाचवण्यासाठी त्याचा मित्र ओमकार भुसावळे (वय २०) हा धावला असता, आरोपींनी त्याच्यावरही हल्ला केला. तसेच फिर्यादी हर्षद खटके याच्यावरही चाकूने वार करून त्याला जखमी करण्यात आले. या हल्ल्यात गोलू गिरी, हर्षद खटके आणि ओमकार भुसावळे हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत.पोलिसांची गाडी येताच आरोपी पळाले; यांच्यावर झाला गुन्हा दाखल!हल्ला सुरू असतानाच सुदैवाने पोलिसांची गाडी त्या भागातून येत असल्याचे दिसताच आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी तात्काळ जखमींना रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी हर्षद खटके याच्या तक्रारीवरून बिटरगाव पोलिसांनी धम्मदीप काळबांडे (२५), सूरज काळबांडे (२२), मोहन काळबांडे (२१), सुनील काळबांडे (२२), अजय काळबांडे (२२), अनिकेत काळबांडे (२१), रंजित वाढवे (१८), शेख असलम शेख इब्राहिम (२१) यांच्यासह अन्य पाच विधीसंघर्षग्रस्त बालकांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

