LatestNewsगोंदियाविदर्भ

गुरुजी थोडक्यात बचावले; मासुलकसा जि. प. शाळेचा स्लॅब खचला! ४० चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ किती दिवस चालणार?

अनर्थ टळला; पण जबाबदार कोण? तक्रारींचा ढीग असूनही झोपलेल्या शिक्षण विभागाला आता तरी जाग येणार का?
देवरी (गोंदिया):
देवरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मासुलकसा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा स्लॅब गुरुवारी, १७ सप्टेंबर रोजी दुपारी अचानक खचल्याने प्रचंड खळबळ उडाली. सुदैवाने इमारतीची दुरवस्था पाहून विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर बसवून शिक्षण दिले जात असल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, वर्गात बसलेले शिक्षक या अपघातात बालंबाल बचावले असून या घटनेने जि. प. शाळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे ऐरणीवर आणला आहे.
शाळेतील शिक्षक काही कामकाजानिमित्त वर्गात बसले असतानाच अचानक छताच्या स्लॅबचा मोठा भाग खचून खाली कोसळला. सुदैवाने विद्यार्थी इमारतीच्या बाहेर बसून शिक्षण घेत असल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, “जर त्याच वेळी ४० लहान मुले वर्गात असती तर काय झाले असते?” असा अंगावर काटा आणणारा प्रश्न आता पालक व ग्रामस्थांना सतावत आहे. या शाळेच्या इमारतीची अत्यंत वाईट दुरवस्था झाल्याबाबत ग्रामस्थांनी यापूर्वीच शिक्षण विभाग आणि पंचायत समितीच्या निदर्शनास आणून दिले होते. वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना किंवा डागडुजी न झाल्याने अखेर आज स्लॅब खचण्याची वेळ आली, असा संतप्त आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासकीय आश्वासनांच्या कागदावरच चिमुकल्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता अडकली आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
मासुलकसा येथील या जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग भरतात. शाळेत सुमारे ४० विद्यार्थी आणि दोन शिक्षक कार्यरत आहेत. स्लॅब खचल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केवळ औपचारिक पाहणी करून वेळ मारून न नेता शाळेच्या संपूर्ण इमारतीची सुरक्षितता तपासावी आणि इमारत तातडीने निष्कासित करून विद्यार्थ्यांसाठी पर्यायी सुरक्षित व्यवस्था करावी, अशी आग्रही मागणी होत आहे. “विद्यार्थ्यांच्या डोक्यावर सुरक्षित छप्पर देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे; दुर्घटनेची वाट पाहणे हा उपाय असू शकत नाही,” अशी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *