LatestNewsगोंदियाविदर्भ

गोंदिया एलसीबीची वाळू माफियांविरुद्ध धडक मोहीम; ५ ट्रॅक्टर, १ टिप्परसह ५०.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त!

दवनिवाडा, रावणवाडी अन् डुग्गीपार हद्दीत सलग तीन दिवस छापे
८ आरोपींवर गुन्हे दाखल, वाळू तस्करांमध्ये खळबळ
गोंदिया : जिल्ह्यातील विविध नद्यांच्या पात्रांतून छुप्या पद्धतीने वाळूची अवैध उपसा व तस्करी करणाऱ्या माफियांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा (LCB) गोंदियाच्या पथकाने धडक कारवाईचे सत्र सुरू केले आहे. दवनिवाडा, रावणवाडी आणि डुग्गीपार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सलग तीन दिवस नाकाबंदी करून वाळूची विनापरवाना अवैध वाहतूक करणारी वाहने पकडण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी १ टिप्पर, ५ ट्रॅक्टर आणि ७ ब्रास वाळूसह एकूण ५० लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, ८ आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदवले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाईसाठी गस्त घालत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही धडाकेबाज कामगिरी करण्यात आली.
पहिली कारवाई (दवनिवाडा हद्द): १४ सप्टेंबर रोजी महालगाव घाट येथील वैनगंगा नदी पात्रातून वाळू चोरून नेली जात असल्याची माहिती मिळताच महालगाव ते रतनारा मार्गावर नाकाबंदी करण्यात आली. या वेळी २ ट्रॅक्टरमधून २ ब्रास वाळू जप्त करण्यात आली. ट्रॅक्टर चालक व मालक राजकुमार नैताम नागपुरे (वय ३०, रा. महालगाव) आणि जितेंद्र तिलकचंद ठाकरे (वय ४४, रा. देवरी) यांच्यावर गुन्हा दाखल करून १५ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दुसरी कारवाई (रावणवाडी हद्द): १५ सप्टेंबर रोजी तेढवा ते काटी मार्गावर नाकाबंदीदरम्यान १ ट्रॅक्टर व १ टिप्पर पकडण्यात आले. तेढवा घाटातून चोरलेली ३ ब्रास वाळू, ट्रॅक्टर व टिप्पर असा एकूण २१ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला. ट्रॅक्टर चालक खिलेंद्र रामकिशोर म्हात्रे (वय २९, रा. मरारटोला), मालक प्रदीप खुशाल भुरे (वय २२, रा. पांढराबोडी), टिप्पर चालक राहुल राजू उईके (वय २५, रा. सलाईटोला) व टिप्पर मालक यश राधेश्याम लिल्हारे (रा. गद्दाटोली, गोंदिया) यांच्यावर रावणवाडी ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
तिसरी कारवाई (डुग्गीपार हद्द): १६ सप्टेंबर रोजी उमरझरी नाल्यातून वाळू चोरून नेणारे २ ट्रॅक्टर सलाईटोला ते चिरचाळी मार्गावर पकडण्यात आले. ट्रॅक्टर चालक व मालक आशिष राजकुमार राऊत (वय २८) आणि मेघनाथ सखाराम उंदीरवाडे (वय ५३, दोघे रा. डव्वा, ता. सडक अर्जुनी) यांच्याकडून २ ब्रास वाळूसह १२ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून डुग्गीपार ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
कारवाई करणारे एलसीबी पथक
सदर धडाकेबाज कामगिरी पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार संजय चव्हाण, सोमेन्द्रसिंग तूरकर, रियाज शेख, दीक्षितकुमार दमाहे, सुबोध बिसेन, इंद्रजित बिसेन, तुलसीदास लुटे, दुर्गेश तिवारी, छगन विठ्ठले, सुनील डहाके, निखिल मेश्राम, राकेश इंदूरकर तसेच चालक विलेश ठाकरे यांनी केली.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *