मुख्य आरोपी डॉ. नितेश वाजपेयी याचा आत्महत्येचा प्रयत्न
बाळ विक्री प्रकरण : भंडारा-गोंदिया जिल्ह्यात खळबळ
गोंदिया : भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात सध्या गाजत असलेल्या बाळ विक्री प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. नितेश वाजपेयी याने स्वतःवर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस शोध घेत असतानाच आरोपीने हे पाऊल उचलल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, सध्या त्याच्यावर भंडारा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.भंडारा जिल्ह्यातील वरठी येथे उघडकीस आलेल्या १० दिवसांच्या चिमुरडीच्या विक्री प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले होते. काही दिवसांपूर्वी वरठी पोलिसांनी एका टोळीचा पर्दाफाश केला होता, जी नवजात बालकांची लाखो रुपयांना विक्री करत होती. या टोळीचे धागेदोरे गोंदियातील ‘न्यू बालाजी हॉस्पिटल’चा संचालक डॉ. नितेश वाजपेयी याच्यापर्यंत पोहोचले. ३ फेब्रुवारी रोजी एका स्वयंसेवी संस्थेच्या नावाखाली, नवजात बालिकेला उपचारासाठी नागपूरला नेत असल्याचे भासवून अडीच लाख रुपयांत तिची विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणात गोंदिया येथील ‘न्यू बालाजी हॉस्पिटल’चे संचालक डॉ. नितेश वाजपेयी यांच्यासह सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील दोघांना पोलिसांनी आधीच अटक केली आहे. याप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी डॉ. नितेश वाजपेयी हा गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार होता. पोलीस आरोपीचा शोध घेत असतानाच डॉ. नितेश वाजपेयी हा १४ फेब्रुवारी रोजी कटंगी येथून स्वतःच्या वाहनाने भंडाराच्या दिशेने येत होता. दरम्यान, त्याने स्वतःच्या पोटावर आणि शरीराच्या इतर भागांवर ब्लेडने खोलवर वार केले. जखमी अवस्थेत त्याला तातडीने तुमसर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याला भंडारा येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले असून, सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
……………….
कारवाईच्या भीतीने टोकाचे पाऊल?
डॉ. वाजपेयी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असून पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या मागावर होते. येत्या १७ फेब्रुवारी रोजी भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात त्याच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार होती. मात्र, तपासात एकामागून एक धक्कादायक दुवे समोर येत असल्याने आणि अटकेची टांगती तलवार असल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.आरोपी डॉक्टरची प्रकृती स्थिर होताच पोलीस त्याला ताब्यात घेण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे बाळ विक्री प्रकरणातील तपासाला आता वेगळे वळण मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

