खांबी-सिरेगाव पाणीपुरवठा योजना अखेर ठप्प; ऐन पावसाळ्यात ३० गावांवर पाणीटंचाईचे संकट!
थकीत वीजबिलामुळे वीजपुरवठा खंडित; जि. प. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ३० गावांतील नागरिकांवर पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ
गोंदिया/अर्जुनी मोरगाव : ‘हर घर जल’च्या कागदी घोषणा देणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाच्या बेफिकीर व नाकर्त्या कारभारामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खांबी व सिरेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अखेर सप्टेंबर महिन्यापासून पूर्णपणे ठप्प झाली आहे. पूर्वसूचना देऊनही जिल्हा परिषदेचे अधिकारी व लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे दुर्लक्ष केल्यामुळे ऐन पावसाळ्यात तब्बल ३० गावांतील नागरिकांना पाण्यासाठी तीव्र हाल सोसावे लागत आहेत.
गेल्या तीन दिवसांपासून नळाला पाण्याचा थेंबही येत नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी विहिरी आणि बोअरवेलचा आसरा घ्यावा लागत आहे. ऐन पावसाळ्यातही पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून, विहिरींचे अशुद्ध पाणी पिल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेच्या या निष्क्रियतेमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष पसरला आहे.
मागील १९ वर्षांपासून कोणतीही शासकीय अनुदानाची वाट न पाहता स्थानिक पाणीपुरवठा मंडळे व नागरिकांच्या वर्गणीतून या योजना अविरत सुरू होत्या. मात्र, वाढती वीज बिले आणि देखभालीच्या खर्चामुळे या योजनांवर २० ते २५ लाखांची मोठी आर्थिक तूट निर्माण झाली. अखेर थकीत वीजबिलापोटी महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केल्याने पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला.
प्रशासनाकडून केवळ पोकळ आश्वासने:
‘सुजल सामाजिक सेवा संस्थे’चे अध्यक्ष किशोर तरोणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (CEO) रीतसर निवेदन देऊन समस्येची कल्पना देण्यात आली होती. परंतु, प्रशासनाने केवळ पोकळ आश्वासने देऊन वेळ मारून नेली. १९ वर्षे यशस्वीपणे चाललेल्या योजनांना पैशांअभावी मरणासन्न अवस्थेत सोडणाऱ्या प्रशासनाचा हा कोणता न्याय? असा उद्विग्न सवाल नागरिक विचारत आहेत.
रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा इशारा:
पाणीपुरवठा बंद झाल्याने ३० गावांतील महिला व नागरिकांना पाण्यासाठी विहिरींवर रांगा लावाव्या लागत आहेत. प्रशासनाने व स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने हस्तक्षेप करून थकीत वीजबिल भरावे आणि पाणीपुरवठा पूर्ववत करावा. अन्यथा, या ३० गावांतील संतप्त जनता रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा थेट इशारा पाणीपुरवठा मंडळ व ग्रामस्थांनी दिला आहे.

