हत्तींच्या धुमाकुळासमोर वनविभाग हतबल; शेतकरी भयभीत,
प्रशासनाविरोधात संताप उसळला (हत्तीमुक्त परिसर करण्याची ग्रामस्थांची ठाम मागणी)
अर्जुनी-मोर. (Gondia) : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील गडचिरोली जिल्हा सीमेवरील वडेगाव (बंध्या), खोळदा आणि पुष्पनगर या गावांमध्ये जंगली हत्तींच्या कळपाने अक्षरशः हाहाकार माजवला असून, शेतकऱ्यांच्या मक्याच्या, उन्हाळी धानाच्या व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. या सततच्या हल्ल्यांमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडले असून, त्यांच्या कष्टाची उभी शेती काही तासांत उद्ध्वस्त होत आहे.विशेष म्हणजे, गेल्या महिनाभरापासून ३० ते ३५ हत्तींचा कळप वडेगाव-बंध्या परिसरातील गाढवी नदीकाठ व लगतच्या जंगलात ठाण मांडून बसला आहे. दिवसभर जंगल परिसरात वावरणारे हे हत्ती रात्रीच्या अंधारात शेतात घुसून धान, मका आणि इतर पिकांचा अक्षरशः चुराडा करत आहेत. परिणामी, परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये प्रचंड भीती, दहशत आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.वनविभागाचा निष्क्रियपणा उघड; सूचना असूनही कारवाई शून्यया गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार राजकुमार बडोले यांनी दोन वेळा प्रत्यक्ष दौरा करून परिस्थितीची पाहणी केली आणि वनविभागाला तातडीने हत्तींचा बंदोबस्त करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. मात्र, आमदारांच्या सूचनांचाही वनविभागावर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही.घटनास्थळी काही वेळासाठी हालचाल दाखवून वनविभागाकडून केवळ दिखाऊ कारवाई केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. प्रत्यक्षात परिस्थिती ‘जैसे थे’ असून, हत्तींचा धुमाकूळ आणि शेतकऱ्यांचे हाल अजूनही कायम आहेत.गडचिरोलीतून हाकललेले हत्ती अर्जुनीत स्थिरावलेस्थानिकांच्या मते, गडचिरोली वनविभागाने दक्षता घेत विविध उपाययोजना राबवून हत्तींच्या कळपाला आपल्या क्षेत्रातून हुसकावून लावले. मात्र, त्यानंतर या हत्तींच्या कळपाने गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोर तालुक्यातील वडेगाव-बंध्या परिसरात आपले बस्तान बसवले.यावरून गडचिरोलीत कडक कारवाई आणि अर्जुनीत निष्क्रियता असा संतप्त सवाल आता ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. जर गडचिरोली वनविभाग हत्तींचा प्रभावी बंदोबस्त करू शकतो, तर गोंदिया वनविभाग का अपयशी ठरत आहे? असा सवाल शेतकरी आणि नागरिकांकडून उपस्थित होत आहे.मनुष्यबळाचा अभाव की जबाबदारीपासून पळवाट?हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात वनविभाग मनुष्यबळाअभावी कमकुवत पडत असल्याचे सांगितले जात असले, तरी ग्रामस्थ या कारणावर संतुष्ट नाहीत. कारण, प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी नागरिकांचे व शेतकऱ्यांचे रक्षण करणे हीच आहे.दरम्यान, आता धान आणि मका हंगाम संपल्यानंतरही हत्तींचा मुक्काम याच परिसरात राहिला, तर उद्या हे हत्ती गावांमध्ये शिरून जीवितहानी घडवतील का? अशी गंभीर भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.शासन-प्रशासनाविरोधात संताप; “हत्तीमुक्त परिसर”ची जोरदार मागणीवनविभागाच्या ढिसाळ आणि निष्क्रिय कारभारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये शासन व प्रशासनाविषयी तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या जिवावर आणि पिकांवर आलेले हे संकट केवळ पाहत बसण्याचा प्रकार आता सहन केला जाणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.ग्रामस्थांनी शासनाकडे ठाम मागणी करत, या हत्तींच्या कळपाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करून वडेगाव-बंध्या, खोळदा, पुष्पनगरसह संपूर्ण परिसर “हत्तीमुक्त” घोषित करावा, अशी जोरदार मागणी केली आहे.

