LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

चंद्रपूरच्या रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये आगीचे भीषण तांडव! ‘इंडियन मेडिकोज’ एजन्सीतील कोट्यवधींची औषधे जळून खाक

आझाद बागेजवळील तीन मजली इमारत आगीच्या विळख्यात; २० ते २५ अग्निशामक बंब दाखल, इतर दुकानांनाही झळ

चंद्रपूर : शहरातील मध्यवर्ती व अत्यंत गजबजलेल्या आझाद बागेजवळील रघुवंशी कॉम्प्लेक्स या व्यावसायिक संकुलाला बुधवार, ९ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत संकुलात असलेली ‘इंडियन मेडिकोज एजन्सी’ पूर्णपणे भस्मसात झाली असून, कोट्यवधी रुपयांचा औषधसाठा व सर्जिकल साहित्य जळून खाक झाले आहे. आगीचे रौद्ररूप इतके भयानक होते की सकाळपर्यंत संपूर्ण तीन मजली इमारत आगीच्या ज्वाळांमध्ये वेढली गेली होती.मिळालेल्या माहितीनुसार, कमलेश पाजनकर आणि आकाश पाजनकर यांच्या मालकीच्या या नामांकित मेडिकल एजन्सीमध्ये मोठ्या प्रमाणावर सर्जिकल साहित्य, स्पिरिट आणि औषधांचा साठा होता. पहाटेच्या सुमारास दुकानाला अचानक आग लागली. प्राथमिक अंदाजानुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. स्पिरिट व इतर ज्वलनशील साहित्यामुळे आगीने काही वेळातच प्रचंड रौद्ररूप धारण केले.घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर महानगरपालिकेसह चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र (CSTPS) व इतर आस्थापनांच्या २० ते २५ अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, रघुवंशी कॉम्प्लेक्सचा केवळ समोरील भाग मुख्य रस्त्याला लागून असून इतर तिन्ही बाजूंना अत्यंत अरुंद गल्लीबोळ असल्याने अग्निशामक दलाच्या जवानांना घटनास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी व आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. दुपारनंतरही इमारतीतून धुराचे लोट व ठिणग्या बाहेर पडत होत्या. सुदैवाने या भीषण दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.अग्निसुरक्षा व इमारतीच्या अनधिकृत बांधकामावर प्रश्नचिन्ह!रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये दोन डझनांपेक्षा अधिक व्यापारी प्रतिष्ठाने सुरू आहेत. मात्र, अशा अत्यंत गजबजलेल्या व्यापारी संकुलात पुरेशी अग्निसुरक्षा यंत्रणा (Fire Safety System) उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली असून आता सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याशिवाय, संकुलाच्या वरच्या मजल्यांचे व टेरेसचे बांधकाम यापूर्वीही वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. टेरेसवरील कथित अनधिकृत बांधकाम हटवण्याची कारवाई प्रशासनाकडून याआधी करण्यात आल्याचे सांगण्यात येते. तसेच अंडरग्राउंड पार्किंगमध्ये पावसाळ्यात पाणी साचत असल्याने पंपाने उपसावे लागते. या भीषण आगीनंतर आता संपूर्ण संकुलाची संरचनात्मक तपासणी (Structural Audit) आणि अग्निरोधक यंत्रणेची सखोल चौकशी करण्याची जोरदार मागणी जोर धरू लागली आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *