कोरड्या विहिरीत पडून ६० वर्षीय शेतमजुराचा दुर्दैवी मृत्यू; वाचवायला उतरलेले दोघे थोडक्यात बचावले!
कोरड्या विहिरीत पडून ६० वर्षीय शेतमजुराचा दुर्दैवी मृत्यू; वाचवायला उतरलेले दोघे थोडक्यात बचावले!
लाखांदूर तालुक्यातील दिघोरी शिवारातील थरार; विहिरीत विषारी वायूचा संशय
पालांदूर / दिघोरी (भंडारा): शेतशिवारातील कोरड्या विहिरीच्या काठावरून तोल जाऊन खोल विहिरीत पडल्याने ६० वर्षीय वृद्ध शेतमजुराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. तर दुसरीकडे, त्यांना वाचवण्यासाठी विहिरीत उतरलेले दोघे जण विहिरीतील विषारी वायूमुळे गुदमरल्याने मोठा अनर्थ ओढवण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, पोलीस व स्थानिक नागरिकांच्या प्रसंगावधानाने त्या दोघांचे प्राण थोडक्यात वाचले. मंगळवारी दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील दिघोरी शेतशिवारात ही थरारक घटना उघडकीस आली. रामदास पांडुरंग कोहळे (वय ६० वर्षे, रा. दिघोरी, ता. लाखांदूर) असे मृत शेतमजुराचे नाव आहे.शेतमालक राजेश कोटेवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास कोहळे हे शेतातील कामासाठी शेतात बांधलेल्या घरात एकटेच वास्तव्यास होते. मंगळवारी दुपारी ते शेतातील कोरड्या विहिरीजवळ गेले असता अचानक तोल जाऊन थेट खोल विहिरीत कोसळले. बराच वेळ ते न दिसल्याने शोधाशोध केली असता ते विहिरीत निपचित पडल्याचे समोर आले.विहिरीत दूषित वायू; वाचवायला गेलेल्या दोघांचा श्वास गुदमरला!रामदास विहिरीत पडल्याचे समजताच त्यांच्या कुटुंबातील बंडू कोहळे हे त्यांना बाहेर काढण्याच्या उद्देशाने तातडीने विहिरीत उतरले. मात्र, विहिरीच्या तळाशी जाताच त्यांना प्रचंड गुदमरल्यासारखे होऊन अस्वस्थ वाटू लागले. त्यांना वाचवण्यासाठी लगेच वैभव कोहळे यांनीही विहिरीत उतरण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनाही तीव्र कासावीस होऊ लागल्याने विहिरीत प्राणघातक विषारी वायू (गॅस) असल्याची दाट शंका निर्माण झाली. एकाच वेळी दोघे विहिरीत अडकल्याने उपस्थितांचे धाबे दणाणले.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ विहिरीत पाण्याचा मारा केला. पाण्याचा फवारा पडताच विहिरीतील गॅसचा प्रभाव काहीसा कमी झाला आणि बंडू कोहळे यांनी हालचाल केली. यानंतर तातडीने दोघांनाही दोरीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांच्या या समयसूचकतेमुळे दोन जणांचे प्राण वाचले व संभाव्य मोठी दुर्घटना टळली.अग्निशामक दलाने ऑक्सिजन मास्क लावून काढला मृतदेह!विहिरीत दूषित वायू असल्याने पोलिसांनी थेट खाली न उतरता अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाच्या पाच जवानांच्या पथकाने कृत्रिम ऑक्सिजन सिलेंडर आणि मास्कचा आधार घेत सुरक्षितपणे खोल विहिरीत प्रवेश केला आणि रामदास कोहळे यांचा मृतदेह बाहेर काढला.मृत्यूचे नेमके कारण अहवालानंतरच स्पष्ट होणाररामदास कोहळे यांचा मृत्यू उंचावरून खाली पडल्याने झालेल्या गंभीर दुखापतीमुळे झाला की विहिरीतील विषारी वायूमुळे गुदमरून झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवाल (पोस्टमार्टम रिपोर्ट) प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे शेतकरी आणि मजुरांमध्ये भीतीचे सावट पसरले असून दिघोरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

