क्रेटा वाहनाच्या बदल्यात फॉर्च्युनर देण्याचे आमिष; ५ लाख ६५ हजारांची आर्थिक फसवणूक!
गड्डाटोली येथील व्यवसायिकाची ऑनलाईन क्यूआर कोडद्वारे फसवणूक
गोंदिया : वाहनाची देवाणघेवाण करण्याच्या बहाण्याने एका तरुणाची ५ लाख ६५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची खळबळजनक घटना गोंदिया शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश दिपक कुमार चौरसिया (वय ३८, रा. विनायक रेसिडेन्सी, गड्डाटोली, गोंदिया) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. २२ जून २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजेपासून ते २३ जून २०२६ रोजी रात्री २१:३० वाजेदरम्यान वाजपेयी चौक (गोंदिया) परिसरात ही घटना घडली.संशयित मोबाईल क्रमांकधारकाने (पटेल सर कार २४ कर्मचारी) तक्रारदार अंकुश चौरसिया यांना गोंदिया येथील नचिकेत बावनकर यांच्या ‘क्रेटा’ वाहनाच्या बदल्यात ‘फॉर्च्युनर’ कंपनीची गाडी देण्याचे आमिष दाखवले. आरोपीने खोटी बतावणी करून १० लाख रुपयांमध्ये व्यवहार निश्चित केला. व्यवहार ठरल्यानंतर आरोपीने तक्रारदाराला किरीट भाई मानसिंगभाई दाभी आणि रंजकबेन दिनेशकुमार जैन यांच्या नावाचे दोन ऑनलाईन क्यूआर (QR) कोड पाठवले. तक्रारदाराचा विश्वास संपादन करून त्या क्यूआर कोडद्वारे ५ लाख ६५ हजार रुपये भरण्यास भाग पाडले.रक्कम मिळाल्यानंतरही गाडी न देता आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदार अंकुश चौरसिया यांनी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून ५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १९:३० वाजता पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे अप.क्र. ७२२/२०२६, कलम ३१८(४) भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बोरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गेडाम या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

