LatestNewsगुन्हेवार्ताविदर्भ

नागपूरच्या सिव्हिल लाईन्समध्ये खंडणीच्या वादातून पानटपरी चालकाची निर्घृण हत्या; शरीरावर धारदार शस्त्राने २३ वार!

सातपुडा लॉन परिसरातील थरार; दारू पिण्याच्या बहाण्याने बोलावून केला खात्मा, एका अल्पवयीनासह ६ संशयित पोलिसांच्या ताब्यात
नागपूर (८ सप्टेंबर): उपराजधानीतील अत्यंत उच्चभ्रू परिसर मानल्या जाणाऱ्या सिव्हिल लाईन्स भागात पानटपरी लावण्यावरून आणि हप्ता (खंडणी) वसुलीच्या वादातून एका २५ वर्षीय तरुणाची अत्यंत क्रूरपणे धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली. रविवारी मध्यरात्रीनंतर सुमारे १:३० वाजता सातपुडा लॉनजवळील गल्लीत हा रक्तरंजित थरार घडला. हल्लेखोरांनी तरुणाच्या शरीरावर धारदार शस्त्राने तब्बल २३ वार केले, ज्यामुळे त्याचा जागीच तडफडून मृत्यू झाला.
आकाश सुरेश नेवारे (वय २५ वर्षे, रा. तेलंगखेडी, गोंडटोली खदान, रविनगर, नागपूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
दारू पिण्याच्या बहाण्याने बोलावले अन् संपवले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश नेवारे याची रविनगर चौक येथील बसस्टॉपजवळ ‘एमएच-४०’ नावाने पानटपरी आहे. ही दुकान चालवण्यासाठी आरोपी आकाशकडे पैशांची (हप्त्याची) मागणी करत होते. यावरून त्यांच्यात जुना वाद व वैमनस्य निर्माण झाले होते.
याच पूर्ववैमनस्यातून आरोपींनी आकाशला मध्यरात्री सिव्हिल लाईन्स येथील सातपुडा लॉनच्या गल्लीत दारू पिण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. तेथे त्यांच्यात पुन्हा जोरदार वाद झाला. वाद विकोपाला जाताच दबा धरून बसलेल्या टोळक्याने धारदार चाकू व शस्त्रांनी आकाशवर एकापाठोपाठ एक तब्बल २३ वार केले. गंभीर जखमी झालेला आकाश रक्ताच्या थारोळ्यात जागीच गतप्राण झाला.
भावाच्या तक्रारीवरून गुन्हा; एका अल्पवयीनासह ६ संशयित गजाआड
घटनेनंतर आकाशचा भाऊ पंकज सुरेश नेवारे (वय २३ वर्षे) याच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलीस ठाण्याचे पीएसआय राहुल वंजारी यांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), ३(५) आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला.
सीताबर्डी पोलीस व गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने तातडीने कारवाई करत पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या ६ संशयितांना ताब्यात घेतले. यामध्ये विशाल ऊर्फ बबलू (वय २५), पीयूष ऊर्फ पेढा बघेल (वय २२), विशाल ऊर्फ बब्बू काल्या चचाने (वय २५), रणजीत ऊर्फ रंजू गोपाल महतो (वय २५), मृणाल भूरा दिवान (वय २३) आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. ठाणेदार सुहास राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हत्याकांडातील शस्त्रे जप्त करणे व सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी करत आहेत.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *