खेळताना पाय घसरून तलावात पडल्याने ७ वर्षीय चिमुरड्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू!
निलज येथील मन हेलावून टाकणारी घटना
अर्जुनी मोरगाव : घराशेजारील तलावाजवळ मित्रांसोबत खेळत असताना अचानक पाय घसरून पाण्यात पडल्याने सात वर्षांच्या निष्पाप बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ही दुर्दैवी घटना शनिवार, ५ सप्टेंबर रोजी तालुक्यातील निलज येथे घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जयेंद्र भुमेश चौधरी (वय ७ वर्षे, रा. निलज, ता. अर्जुनी मोरगाव) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयेंद्र हा नेहमीप्रमाणे आपल्या बालमित्रांसोबत घराबाहेर खेळण्यासाठी गेला होता. खेळत असताना ते घराशेजारील गाव तलावाच्या परिसरात पोहोचले. दरम्यान, तलावाच्या काठावर जयेंद्रचा अचानक पाय घसरला आणि तो खोल पाण्यात पडला. पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडू लागला.
मित्रांनी आरडाओरड करताच परिसरातील नागरिकांनी तातडीने तलावाच्या दिशेने धाव घेतली. गावकऱ्यांनी जयेंद्रला पाण्यातून बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले; मात्र तोपर्यंत त्याचा दुर्दैवी अंत झाला होता. जयेंद्रच्या मृत्यूची वार्ता गावात पसरताच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पाणीसाठ्यांजवळ लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर!
गावातील तलाव, विहिरी, खड्डे व इतर पाणीसाठ्यांच्या परिसरात लहान मुले खेळायला जातात, मात्र अशा ठिकाणी कोणतीही संरक्षक भिंत किंवा सुरक्षा व्यवस्था नसते. पावसाळ्याच्या दिवसांत पाणीसाठे तुडुंब भरलेले असल्याने थोडीशी निष्काळजीही जिवावर बेतू शकते. निलज येथील या दुर्दैवी घटनेनंतर पालकांनी लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावे आणि त्यांना धोकादायक पाण्याच्या ठिकाणांपासून दूर ठेवावे, अशी मागणी व आवाहन ग्रामस्थांमधून व्यक्त केले जात आहे.

