त्या कुटुंबाला माजी आ.कोरोटे यांची सांत्वनपर भेट
सखोल चौकशी करून न्याय द्या
देवरी : गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा मुख्यालयापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या गडचिरोली ते आरमोरी या राष्ट्रीय महामार्गावरील काटली नजीक ८ ऑगस्ट पहाटे ४:३० ते ५:०० वाजताच्या सुमारास आरमोरीकडे भरधाव वेगात जाणार्या मालवाहू ट्रकने व्यायाम करणार्या सहा विद्यार्थ्यांना जबर धडक देत चार जणांचा बळी घेतल्याची घटना घडली होती. या घटनेतील मृतकाच्या कुटूंबाची गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे संपर्कप्रमुख तसेच आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे माजी आ.सहसराम कोरोटे व संदीप ठाकूर जिल्हाप्रमुख गडचिरोली यांनी सांत्वन पर भेट देत त्याच्याकडून आर्थिक मदत करण्यात आली.

आरमोरी येथील घटनेत मृत्तकांमध्ये काटली येथील टिकू भोयर, तनवीर मानकर, दिशांत मेश्राम, तुषार मारबते या चार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर आदित्य कोहपरे, क्षितिज मेश्राम हे दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते. महाराष्ट्र राज्याला हादरवून सोडणार्या या घटनेत मृत तसेच जखमींच्या कुटुंबाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आर्थिक मदत म्हणून गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे संपर्कप्रमुख तसेच आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे माजी आ.सहसराम कोरोटे व संदीप ठाकूर जिल्हाप्रमुख गडचिरोली यांनी सांत्वन पर भेट देत त्याच्याकडून मदत करण्यात आली. त्याचप्रमाणे राज्य शासन आपल्या दुःखात सहभागी असून आपल्या पाठीशी आहे. अशा शब्दात माजी आ. कोरोटे यांनी शोकाकुल कुटुंबांला धीर दिला. तसेच पोलिस अधिक्षक जिल्हा गडचिरोली यांना सखोल चौकशीचे आदेश दिले.
भेटी दरम्यान महिला जिल्हाप्रमुख गडचिरोली अर्चना गोंधळे, तालुका प्रमुख मधु चौधरी, शैलेश कोहळे, सरपंच अरुण उंदीरवाडे, गुणाजी बोरकुटे, पुण्यवान चोरटे तसेच शिवसेना पक्षाची कार्यकर्ते व पदाधिकारी आणि गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

