महाराजस्व अभियान शिबिरातून 5 हजार फेरफार निकाली
नागपूर : नागपूर विभागातील सर्व सहा जिल्ह्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात 7 आणि 14 मार्च 2026 रोजी महाराजस्व समाधान शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. याद्वारे विविध सेवा नागरिकांना पुरविण्यात आल्या असून विभागात 5 हजार 663 फेरफार निकाली काढण्यात आल्याची माहिती, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिली.श्रीमती बिदरी यांनी नागपूर विभागातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली. या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाराजस्व व समाधान शिबिराचा आढावा घेण्यात आला. या शिबिरांद्वारे नागरिकांना देण्यात आलेल्या विविध सेवांविषयी माहिती देण्यात आली. विभागात 7 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या महाराजस्व समाधान शिबिरात 2 हजार 744 फेरफार निकाली काढण्यात आले तर 14 मार्च 2026 रोजी आयोजित शिबिरात 2 हजार 919 असे एकूण 5 हजार 663 फेरफार निकाली काढण्यात आले आहेत.या अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात 7/12 उताऱ्यातील दुरुस्ती संदर्भात 2 हजार 587 अर्ज स्वीकारण्यात आले. तर एकूण 18 हजार 487 डिजिटल 7/12 उतारे उपलब्ध करून देण्यात आले. या कालावधीत विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित समाधान शिबिरात एकूण 11 हजार 225 डिजिटल 8-अ उतारे उपलब्ध करून देण्यात आले. समाधान शिबिरांमध्ये पहिल्या टप्प्यात एकूण 19 हजार 286 विविध प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. एक खिडकी व्यवस्थेंतर्गत 9 हजार 73 अर्ज निकाली काढण्यात आले. महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित शिबिरांमध्ये 478 भूसंपादन प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तरी प्रकरणे अद्यावत करण्यात आले. तसेच, 54 प्रकरणांमध्ये कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्यावत करण्यात आल्याचे श्रीमती बिदरी यांनी सांगितले. दरम्यान, पहिल्या टप्प्यात नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये 7 आणि 14 मार्च रोजी तालुका निहाय मंडळ स्तरावर समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले. यानंतर दुसऱ्या टप्प्यात 10 व 17 एप्रिल रोजी समाधान शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.तसेच तिसऱ्या टप्प्यात नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर 8 व 15 मे रोजी महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.
………………..
अभियानाच्या पर्यवेक्षणासाठी जिल्हा निहाय नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती
छत्रपती शिवाजी महाराज महाराजास्व समाधान शिबिर अभियानाच्या पहिल्या टप्प्याच्या पर्यवेक्षणासाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी विभागीय आयुक्तालयातील सहा अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली. यानुसार नागपूर जिल्ह्यासाठी महसूल अपर आयुक्त राजेश खवले त्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. सामान्य प्रशासन अपर आयुक्त तेजुसिंग पवार यांची भंडारा जिल्ह्यासाठी, पुनर्वसन व भूसंपादन सह आयुक्त विजया बनकर यांची वर्धा जिल्ह्यासाठी, रोहयो सह आयुक्त अविनाश हदगल यांची गोंदिया जिल्ह्यासाठी,करमणूक कर सह आयुक्त तुषार मटकर यांची चंद्रपूर जिल्ह्यासाठी आणि प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी अविनाश शिंदे यांची गडचिरोली जिल्ह्यासाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

