गायमुख-लेंडेझरी मार्गावर प्रवाशांना वाघाचे थेट दर्शन; १० ते १२ गावांतील नागरिकांमध्ये भीती !
वाहनांसमोरून बिनधास्तपणे गेला निघून; प्रवाशांनी मोबाईलमध्ये कैद केला थरारक व्हिडिओ
तुमसर/जवाहरनगर: तुमसर तालुक्यातील गायमुख ते लेंडेझरी मुख्य मार्गावर भरदिवसा सकाळी ७ वाजेच्या सुमारास प्रवाशांना थेट वाघाचे दर्शन झाल्याने संपूर्ण पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे. या मार्गावरून जाणाऱ्या काही धाडसी नागरिकांनी वाघाचा हा थरारक वावर आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरताच परिसरातील १० ते १२ गावांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गायमुख परिसर हा सातपुडा पर्वतभागाच्या घनदाट जंगलाला लागून असल्याने येथे वन्यप्राण्यांचा नेहमीच वावर असतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून थेट मुख्य रस्त्यावरच पट्टेरी वाघाचे दर्शन घडत असल्याने ग्रामस्थ आणि प्रवाशांची चिंता प्रचंड वाढली आहे. सध्या श्रावण महिना सुरू असून श्रावण सोमवारासह इतर दिवशीही गायमुख येथील प्रसिद्ध देवस्थानात दर्शनासाठी भाविकांची मोठी वर्दळ असते. अशा गजबजलेल्या मार्गावरच वाघ ठाण मांडून बसल्याचे समोर आल्यामुळे भाविक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वाघाच्या हल्ल्यात दोन जणांचा गेलाय बळी!
तुमसर तालुक्यातील विविध भागांत मागील काही दिवसांत वाघाचे दर्शन वारंवार घडले आहे. यापूर्वी झालेल्या वाघाच्या हल्ल्यात दोघांचा नाहक बळी गेल्याच्या घटना ताज्या असतानाच, आता पुन्हा गायमुख-लेंडेझरी मार्गावर वाघ उजळ माथ्याने फिरताना दिसल्याने परिसरातील शेतकरी आणि मजुरांचे धाबे दणाणले आहेत. जंगलातील मानवी हस्तक्षेप आणि वन्यजीवांचा वाढता वावर यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष पेटण्याची भीती निर्माण झाली असून, वन विभागाने तातडीने गस्त वाढवावी अशी जोरदार मागणी केली जात आहे.
लोहारा गावात वाघाचा धुमाकूळ; वासराचा पाडला फडशा!
दुसरीकडे, गट ग्रामपंचायत कBoundी (कोंढी) अंतर्गत येणाऱ्या लोहारा गावातही वाघाने धुमाकूळ घातला आहे. लोहारा येथील रहिवासी दलित शामराव श्यामकुमार यांच्या घरामागे बांधलेले पाळीव वासरू अचानक बेपत्ता झाले होते. शोध घेतला असता लोहारा-कोटगाव मार्गावरील दाट झुडपात त्या वासराचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. वाघानेच या वासराची शिकार केल्याचे स्पष्ट झाले.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी, उपसरपंच अंजली नागदेवे व पोलीस पाटील शेखर ढोक यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. पायांच्या ठशांवरून (पगमार्क) वाघाचा या परिसरात मुक्काम असल्याचे निष्पन्न झाले आहे. वन विभागाने या भागात तात्काळ पाच ट्रॅप कॅमेरे लावले असून पीडित शेतकरी दलित श्यामकुमार यांनी तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे वन विभागाच्या सुस्त कारभारावर नागरिक तीव्र संताप व्यक्त करत असून, नरभक्षक किंवा हिंसक बनण्यापूर्वी या वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

