LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्र

देवरी तालुक्यातील लोहाराजवळ दुचाकी-चारचाकीचा भीषण अपघात; १७ वर्षीय मुलीसह चौघे गंभीर!

समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत दोन्ही वाहनांचा चक्काचूर; दोघांची प्रकृती चिंताजनक
देवरी/लोहारा:
देवरी तालुक्यातील लोहारा गावाजवळ गुरुवार, ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास दुचाकी आणि चारचाकी वाहनाची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडला. या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अपघातात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीसह चौघे जण गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातात कु. किर्तिका रमेश बागडे (वय १७, रा. परसटोला, देवरी), नरेश प्रल्हाद वासनिक (रा. आमगाव), ललीत प्रेमकुमार पंधराम (वय २२, रा. आमगाव), देवानंद भत्कवरदी (वय ३०, रा. आमगाव) हे जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, क्रमांक MH 35 AW 7215 असलेले चारचाकी वाहन आमगावकडून देवरीच्या दिशेने येत होते. त्याच वेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीने चारचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण व जोरदार होती की, दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान होऊन चक्काचूर झाला. अपघाताचा मोठा आवाज होताच लोहारा परिसरातील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली, ज्यामुळे काही वेळातच नागरिकांची मोठी गर्दी जमली.
तातडीने १०८ रुग्णवाहिकेतून गोंदियाला हलवले!
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत १०८ रुग्णवाहिका, नरेंद्र महाराज संस्थानची रुग्णवाहिका तसेच देवरी पोलिसांना तात्काळ पाचारण केले. नागरिकांच्या सहकार्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमींना तात्काळ देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर चौघांचीही गंभीर अवस्था पाहता पुढील उपचारासाठी गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात येत आहे. या भीषण अपघातामुळे लोहारा परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघात नेमका कोणाच्या निष्काळजीपणामुळे घडला, याचा पुढील तपास देवरी पोलीस करत आहेत.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *