LatestNewsगोंदियाविदर्भ

एलसीबीची धडाकेबाज कारवाई : वैनगंगा नदीपात्रातून वाळूची अवैध वाहतूक; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त!

स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया पोलीस पथकाचा दणका
६ आरोपींवर गुन्हे दाखल; ५ ब्रास वाळूसह १ टिप्पर व ३ ट्रॅक्टर जप्त
गोंदिया : जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी उघडलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) गोंदियाच्या पथकाने धाडसी कारवाई करत वाळूची अवैध वाहतूक उघडकीस आणली आहे. दावनिवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महालगाव येथील वैनगंगा नदीच्या पात्रातून रेतीची विनापरवाना चोरी करून वाहतूक करणाऱ्या १ टिप्पर आणि ३ ट्रॅक्टरसह तब्बल ३० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी ६ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनात १ सप्टेंबर रोजी एलसीबीचे पथक जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गस्त घालत होते. यादरम्यान, दावनिवाडा हद्दीतील महालगाव घाट येथील वैनगंगा नदीच्या पात्रातून वाळूचा उपसा करून ट्रॅक्टर व टिप्परद्वारे बेकायदेशीर विक्रीसाठी वाहतूक केली जात असल्याची अत्यंत गोपनीय व खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली. माहिती मिळताच पथकाने मौजा महालगाव ते धापेवाडा जाणाऱ्या रस्त्यावर तात्काळ नाकाबंदी केली. काही वेळातच महालगावच्या दिशेने १ लहान टिप्पर आणि त्याच्या पाठोपाठ ३ ट्रॅक्टर एकापाठोपाठ एक येताना दिसून आले. पोलिसांनी वाहने अडवून पंचांसमक्ष तपासणी केली असता, सर्व वाहनांमध्ये वाळू भरलेली आढळली. चालकांकडे वाळू वाहतुकीच्या परवान्याची विचारणा केली असता, त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे आणि ही वाळू वैनगंगा नदीपात्रातून चोरी करून विक्रीसाठी नेत असल्याचे निष्पन्न झाले.
३० लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत
कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त केला आहे:
अशोक लेलँड कंपनीचा लहान टिप्पर: किंमत १५ लाख रुपये व त्यातील २ ब्रास वाळू (किंमत १२ हजार रुपये) — एकूण १५,१२,००० रुपये
३ स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर (ट्रॉलीसह): किंमत १५ लाख रुपये व त्यातील ३ ब्रास वाळू (किंमत १८ हजार रुपये) — एकूण १५,१८,००० रुपये
अशा प्रकारे एकूण ३०,३०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
६ आरोपींवर दावनिवाडा ठाण्यात गुन्हा
वाळूची अवैध वाहतूक करताना मिळून आल्याने याप्रकरणी सागर कन्हैय्यालाल नेवारे (वय २८, रा. कुंभारटोली, आमगाव), टिप्पर मालक प्रकाश राऊत (रा. आमगाव), ट्रॅक्टर चालक अंकित कामठे (रा. खुर्शीपार, ता. खैरलांजी, जि. बालाघाट), ट्रॅक्टर मालक राजू अनंतराम बंबारे (वय ३६, रा. महालगाव), ट्रॅक्टर चालक-मालक चैनलाल मदारीलाल बंबारे (वय ५१, रा. महालगाव) आणि ट्रॅक्टर चालक-मालक चरण भाऊलाल मंदरेले (वय ३५, रा. महालगाव) या ६ आरोपींविरुद्ध दावनिवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कारवाईत यांचा सहभाग
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशान्वये आणि एलसीबीचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार संजय चव्हाण, सोमेन्द्रसिंग तूरकर, रियाज शेख, दीक्षितकुमार दमाहे, सुबोध बिसेन आणि छगन विठ्ठले (सर्व रा. स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया) यांच्या पथकाने पार पाडली.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *