LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

महिलावर धारदार शस्त्राने वार करणाऱ्या आरोपीस ३ हजार रुपये दंड; १ वर्षाच्या चांगल्या वर्तणुकीच्या अटीवर न्यायालयाचा निकाल

गोंदिया (प्रतिनिधी) : मुलाच्या टी-शर्टवर हात पुसण्यावरून झालेल्या क्षुल्लक वादातून महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला करणाऱ्या आरोपीस गोंदिया न्यायालयाने दोषी ठरवले आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी योगेश्वरी राऊत यांच्या न्यायालयाने आरोपीला ३ हजार रुपयांचा दंड ठोठावत, पुढील एक वर्षापर्यंत चांगल्या वर्तणुकीच्या (सदाचाराच्या) अटीवर रिहा करण्याचा निर्णय दिला आहे.
ही घटना २७ ऑक्टोबर २०२१ रोजी गोंदिया शहरातील कुंभारटोली (वाजपेयी वॉर्ड) परिसरात घडली होती. तक्रारदार रेखा राधेश्याम मोहनानी (वय ४६) यांचा मुलगा शेजारी आयोजित वास्तू पूजन कार्यक्रमाच्या भोजनासाठी गेला होता. यावेळी आरोपी राज भीकम देशमुख (वय २०, रा. कुंभारटोली) याने एका लहान मुलाच्या टी-शर्टवर आपले तोंड व हात पुसले. यावर रेखा मोहनानी यांनी जाब विचारला असता, संतापलेल्या आरोपीने अश्लील शिवीगाळ करत खिशातील चाकूने रेखा यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले होते.


या प्रकरणी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार विवेक यादव यांनी करून न्यायालयात सबळ पुराव्यांसह दोषारोपपत्र दाखल केले.तपास पथकाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल व आरोपीला शिक्षा मिळवून दिल्याबद्दल पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील दरेकर आणि पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांनी तपास अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.
सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य :
सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील प्रणिता जोशी (कुलकर्णी) यांनी बाजू मांडली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी राज देशमुख याला दोषी धरले. न्यायालयीन कामकाजात महिला पोलीस अंमलदार जायसवाल यांनी सहकार्य केले.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *