पंचायत समितीच्या सात विभागांत पाणी टंचाईचे चटके; कर्मचारी तहानलेले, फिल्टर यंत्र ठरले शोभेची वास्तू
गोरेगाव : येथील पंचायत समिती कार्यालयात कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. कार्यालयाच्या परिसरात दोन बोअरवेल उपलब्ध असूनही पाइपलाइनमधील त्रुटींमुळे सात महत्त्वाच्या विभागांना पाणीपुरवठा होत नसल्याने कर्मचाऱ्यांवर पिण्याचे पाणी विकत घेण्याची पाळी आली आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडेच पाणी नसल्याने प्रशासकीय कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पंचायत समिती अंतर्गत येणारे घरकुल विभाग, बांधकाम, शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन, मनरेगा आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभाग सध्या कर्मचारी वसाहतीमधून आपला गाडा हाकत आहेत. या वसाहतीत नळ जोडणी करण्यात आली आहे, मात्र प्रत्यक्षात नळाला पाणीच येत नसल्याने कर्मचाऱ्यांना दररोज पाण्याचे कॅन विकत घ्यावे लागत आहेत. शिक्षण विभागात जिल्हा परिषदेने ३९ हजार रुपये खर्च करून बसवलेले वॉटर फिल्टर यंत्र पाणीपुरवठ्याअभावी केवळ शोभेची वस्तू बनले आहे.
प्रसाधनगृहांची दुरवस्था; उघड्यावर जाण्याची नामुष्की
पाणी नसल्यामुळे प्रसाधनगृहांचा वापर करणे अशक्य झाले आहे. यामुळे कर्मचारी आणि कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना उघड्यावर लघुशंका उरकावी लागत आहे. तसेच, सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही पिण्याचे शुद्ध पाणी आणि प्रसाधनगृह उपलब्ध नसल्याने प्रचंड हाल सोसावे लागत आहेत.
एकीकडे मुख्य इमारतीतील सांख्यिकी, समाजकल्याण, आरोग्य विभाग आणि सभापती-उपसभापती कार्यालयांत नियमित पाणीपुरवठा होत असताना, दुसऱ्या बाजूला कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत असलेल्या इतर सात विभागांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का? असा संतप्त सवाल विचारला जात आहे. या मूलभूत सुविधेअभावी कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून, प्रशासनाने तातडीने पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

