NSUI : एनसीईआरटीच्या नव्या मॉड्यूलवर एनएसयूआयचा तीव्र निषेध
गोंदिया : अलीकडे एनसीईआरटी तर्फे जारी करण्यात आलेल्या “Partition Horrors Remembrance Day” या मॉड्यूलमध्ये भारताच्या फाळणीची संपूर्ण जबाबदारी केवळ मोहम्मद अली जिना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि लॉर्ड माउंटबॅटन यांच्यावर टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की – “जिना यांनी फाळणीची मागणी केली, काँग्रेसने ती मान्य केली आणि माउंटबॅटन यांनी घाईगडबडीत ती अंमलात आणली.”एनएसयूआय गोंदिया जिल्हाध्यक्ष अमन तिगाला यांनी या बदलाला इतिहासाशी गंभीर छेडछाड ठरवत विरोध नोंदवला आहे.
“शिक्षणाचा पाया हा सत्यावर आधारित असला पाहिजे, राजकीय प्रचारावर नव्हे. विद्यार्थ्यांना असत्य आणि एकतर्फी इतिहास शिकवणे म्हणजे लोकशाही व राष्ट्राच्या सामूहिक स्मृतीशी अन्याय होय.”त्यांनी सांगितले की मूळ एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांत फाळणीची कारणे संतुलित पद्धतीने मांडण्यात आली होती. त्यामध्ये ब्रिटीशांचे “फोडा आणि राज्य करा” धोरण, सांप्रदायिक ध्रुवीकरण, आर्थिक परिस्थिती आणि दुसऱ्या महायुद्धानंतरचा जागतिक दबाव – या सर्व घटकांना जबाबदार मानले गेले होते.प्रख्यात इतिहासकार प्रा. बिपन चंद्र, प्रा. रामचंद्र गुहा, प्रा. मुशीरुल हसन, प्रा. इरफान हबीब व प्रा. आदित्य मुखर्जी यांनी देखील स्पष्ट केले आहे की फाळणी हा बहुआयामी कारणांचा परिणाम होता, केवळ तीन व्यक्तींच्या निर्णयाचा नव्हता असे अमन तिगाला यांनी निवेदनात म्हटले आहे. यासंदर्भात एक निवेदन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना उपविभागीय अधिकारी, गोंदिया यांच्यामार्फत सादर करण्यात आले.प्रतिनिधी मंडळामध्ये एनएसयूआय गोंदिया जिल्हाध्यक्ष अमन तिगाला, जिल्हा उपाध्यक्ष राहुल बावनथडे, गोरेगाव तालुका अध्यक्ष प्रिन्स ऊके, आशिक बिसेन, सौरभ सोनेवाने, सुशील राहंगडाले यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

