प्रेयसीला उपचाराविना एकटेच सोडून प्रियकर पसार; २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू!
निष्काळजीपणाने मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल
गोंदिया : तब्येत बिघडून प्रकृती अत्यंत गंभीर झाली असतानाही उपचारासाठी रुग्णालयात न नेता प्रेयसीला रस्त्यावर असहाय्य अवस्थेत सोडून पळ काढणाऱ्या निर्दयी प्रियकराविरुद्ध गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे या २१ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
नंदिनी प्रेमसिंग चव्हाण (वय २१ वर्षे, रा. धामणगाव, ता. आमगाव, जि. गोंदिया) असे मृत तरुणीचे नाव असून, जागेश्वर ऊर्फ सोनू हेमराज पटले (वय २९ वर्षे, रा. धामणगाव, ता. आमगाव, जि. गोंदिया) असे गुन्हा दाखल झालेल्या प्रियकराचे नाव आहे.
उपचाराऐवजी घटनास्थळावरून पळ काढला
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक नंदिनी व आरोपी सोनू पटले यांच्यात प्रेमसंबंध होते. ५ जुलै २०२६ रोजी रात्री ८:३० ते ११:५१ वाजेच्या दरम्यान दोघे एकत्र असताना मौजा सावराटोली बसस्थानकाजवळ नंदिनीची प्रकृती अचानक बिघडली. तिला चक्कर येत असल्याने ती गाडीवर बसू शकत नव्हती आणि तिला बोलणेही कठीण झाले होते. प्रकृती चिंताजनक असल्याने तिला तातडीने वैद्यकीय उपचारांची नितांत गरज होती.
मात्र, आरोपी सोनू पटले याने तिला रुग्णालयात दाखल न करता आणि तिच्या उपचाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून तिला घटनास्थळी एकटेच सोडून दिले. एवढेच नव्हे तर तरुणीने विश्वासाने दिलेला तिचा मोबाईल स्वतःजवळ ठेवून, तिच्या नातेवाइकांना तिच्या प्रकृतीबाबत कोणतीही खरी माहिती न देता तो घटनास्थळावरून पसार झाला. वेळेत उपचार न मिळाल्याने शेवटी तिचा मृत्यू झाला.
मर्ग चौकशीअंती गुन्हा नोंद
या प्रकरणी सुरुवातीला गोंदिया ग्रामीण पोलिसांत मर्ग दाखल करण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक वर्षा तुकाराम नैताम यांनी केलेल्या सखोल चौकशीत प्रियकराच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळेच तरुणीचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर मर्ग चौकशी अहवालाच्या आधारे २९ ऑगस्ट २०२६ रोजी आरोपी जागेश्वर ऊर्फ सोनू पटले याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १०६(१) (निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरणे) व ३१६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक वैभव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वीरेंद्र भोसले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

