लग्नाच्या वादातून तरुणीची कोटरा धरणात उडी घेऊन आत्महत्या!
प्रियकराविरुद्ध सालेकसा पोलिसांत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
सालेकसा (गोंदिया): लग्नाच्या कारणावरून प्रियकराने वारंवार केलेल्या भांडणामुळे आणि असह्य मानसिक त्रासाला कंटाळून २४ वर्षीय तरुणीने कोटरा धरणात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मृत तरुणीच्या वडिलांच्या तक्रारीवरून सालेकसा पोलिसांनी आरोपी प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कल्पना तेजराम भोयर (वय २५ वर्षे, रा. हरदोली, पो. सावली, ता. देवरी, जि. गोंदिया) असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. तर इंद्रजित दयाराम घासले (वय अंदाजे २६ वर्षे, रा. शेरेपार, ता. सालेकसा, जि. गोंदिया) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
लग्नाच्या विषयावरून सतत भांडण
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक कल्पना भोयर आणि शेरेपार येथील रहिवासी इंद्रजित घासले यांच्यात गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध होते. दरम्यान, त्यांच्यात लग्नाच्या विषयावरून सातत्याने वाद व भांडणे होत होती. प्रियकराकडून होणाऱ्या वारंवारच्या वादांमुळे कल्पना प्रचंड मानसिक तणावाखाली वावरत होती. या त्रासाला कंटाळून तिने २३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घरात कोणालाही काही न सांगता निघून जाऊन मौजा कोटरा धरणाच्या पाण्यात उडी मारून जीवन संपवले.
चौकशीनंतर गुन्हा दाखल
याप्रकरणी सालेकसा पोलीस ठाण्यात सुरुवातीला दाखल मर्ग खबरीच्या चौकशी कागदपत्रांचे अवलोकन करून आणि मृत तरुणीचे वडील तेजराम मारुती भोयर (वय ४५ वर्षे, रा. हरदोली) यांच्या तोंडी रिपोर्टवरून २९ ऑगस्ट २०२६ रोजी आरोपी इंद्रजित घासले याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १०८ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास सालेकसा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक रवी नागोसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मावस्कर करत आहेत.

