कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या ४२ गोवंशांची स्थानिक गुन्हे शाखेकडून थरारक सुटका; ५१.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त!
सालेकसा हद्दीतील दलदलकूही-धनेगाव मार्गावर नाकाबंदी करून २ मोठे कंटेनर पकडले; १३ आरोपींवर गुन्हा दाखल
गोंदिया/सालेकसा: कत्तलीच्या उद्देशाने दोन महाकाय कंटेनर ट्रकमध्ये अत्यंत क्रूर आणि अमानुषपणे डांबून नेण्यात येणाऱ्या तब्बल ४२ गोवंश जनावरांची गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने यशस्वी सुटका केली आहे. सालेकसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दलदलकूही ते धनेगाव मार्गावर नाकाबंदी करून ही धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी ४२ गोवंश, दोन कंटेनर ट्रक आणि ४ मोबाईल असा एकूण ५१ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, एकूण १३ आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक अवैध धंद्यांवर कारवाईसाठी गस्त घालत असताना, सालेकसा हद्दीतील मौजा दलदलकूही परिसरातून दोन कंटेनर ट्रकमध्ये गोवंश जनावरे कोंबून नागपूरकडे कत्तलीसाठी नेली जात असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी दलदलकूही ते धनेगाव जाणाऱ्या रस्त्यावर तात्काळ नाकाबंदी लावली. काही वेळातच दलदलकूहीकडून येणारे दोन संशयित कंटेनर ट्रक पथकाने अडवले.

कप्प्यांची विशेष रचना करून कोंबली होती जनावरे!
पोलिसांनी दोन्ही कंटेनरची तपासणी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला. जनावरांची अवैध वाहतूक सुलभ व्हावी यासाठी ट्रक मालकांनी कंटेनरमध्ये मागच्या बाजूस आडवी लोखंडी पाटी, केबिनमधून आत जाण्यासाठी दरवाजा आणि वरच्या बाजूस हवा येण्या-जाण्यासाठी खिडक्यांची विशेष रचना केली होती. या कंटेनर्समध्ये एका ट्रकमध्ये २५ आणि दुसऱ्या ट्रकमध्ये १७ अशा एकूण ४२ गोवंशांना दाटीवाटीने, क्रूरपणे बांधून ठेवण्यात आले होते.
पोलिसांनी घटनास्थळावरून ६ लाख ३० हजार रुपये किमतीची ४२ गोवंश जनावरे, ४५ लाख रुपयांचे दोन कंटेनर ट्रक आणि ५७ हजार रुपयांचे ४ अँड्रॉइड मोबाईल असा एकूण ५१ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
नागपूरच्या कत्तलखान्यांशी धागेदोरे; १३ जणांवर गुन्हा दाखल!
चालकांची कसून चौकशी केली असता, आरोपी सैफर भाई याने ही जनावरे दलदलकूही परिसरातून खरेदी करून कळमना (नागपूर) येथील मुंजबिल कुरैशी आणि सिताबर्डी येथील फैजुल हसन यांच्याकडे कत्तलीसाठी पाठवल्याचे उघड झाले.
या प्रकरणी कंटेनर चालक व वाहक १) इद्रिश कलुवा कुरैशी (वय ५०, रा. टेकानाका, नागपूर/आग्रा, यूपी), २) अन्वर शब्बीर अली (वय ४६, रा. भाजी मंडी, कामठी), ३) अब्दुल रहमान असलम (वय ३८, रा. यशोदानगर, नागपूर), ४) फैजल अन्सारी (नागपूर), ५) रोहीत राजू डेहरे (वय २५, रा. यशोदानगर, नागपूर), ६) गुलाम रसूल मो. आलेनबी (वय ४०, रा. टेकानाका, नागपूर), ट्रक मालक ७) जावेद अहमद मो. मुस्तफा (रा. उप्पलवाडी, नागपूर), ८) हरीलाल ब्रिजभानसिंग (रा. लावा वाडी, नागपूर), मुख्य सूत्रधार ९) सैफर भाई, व्यापारी १०) मुंजबिल कुरैशी (कामठी), ११) फैजुल हसन (सिताबर्डी, नागपूर) तसेच स्थानिक विक्रेते १२) रिताबाई मोहबे (रा. कुंभारटोली, आमगाव) आणि १३) रिताबाई मोहबे यांचे पती यांच्याविरोधात प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा १९६० व महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ अंतर्गत सालेकसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर धडाकेबाज कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अभिषेक जंगमवार, पोहवा तुलसीदास लुटे, राजकुमार खोटेले, दुर्गेश तिवारी, प्रकाश गायधने, पोशि सुनील डहाके, हंसराज भांडारकर, चालक पोलीस शिपाई निलेश ठाकरे व राम खंदारे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

