LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

जादुटोण्याच्या संशयावरून दिरानेच वहिनीला संपविले

गोबरकहू शेतशिवारात आढळला होता मृतदेह : धक्कादायक उकल, आरोपी दिर अटकेत
धारणी / अमरावती : तालुक्यातील गोबरकहू येथील शेतकरी समोती कासदेकर (५८) ही गुरुवारी सायंकाळी शेतातच मृतावस्थेत आढळून आली होती. या खूनाप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास तिच्या दिराला अटक केली आहे. रामलाल लक्ष्मण कासदेकर (६१, रा. गोबरकहू) असे अटक आरोपीचे नाव आहे.
समोती ही जादुटोणा करते, त्यामुळे आपल्या परिवाराला त्रास होत असल्याच्या संशयावरून आपण तिच्याच गळ्यातील चांदीच्या टागलीने (तागडी) तिचा गळा आवळला, अशी धक्कादायक कबुली त्याने दिली. स्थानिक पोलीस व टीम एलसीबीने अवघ्या १२ तासांत या क्लिष्ट गुन्ह्याचा उलगडा केला.
याप्रकरणी धारणी पोलिसांनी शुक्रवारी पहाटे खूनाचा गुन्हा नोंदवून तपासाला वेग दिला होता. पती रामभाऊंच्या निधनानंतर समोती यांनी शेतीची धुरा सांभाळली होती. त्यांना दोन मुले व सहा मुली आहेत. गुरुवारी दुपारी समोती आपल्या शेतात मका पिकाच्या संरक्षणासाठी गेल्या होत्या. मात्र रात्री शेतशिवारात त्यांचा मृतदेहच आढळला होता.
गळ्यात अर्धा किलो चांदीची तागडी
समोती यांच्या गळ्यात जवळपास अर्धा किलो वजनाची चांदीची तागडी होती. नाकात सोन्याची मोठी रिंग, तर कानात सोन्याचे झुमके तसेच पायातील चांदीचे दागिने सुरक्षित असल्यामुळे हे लुटमारीचे प्रकरण नाही, असा कयास पोलिसांनी व्यक्त केला होता. तो तंतोतंत खरा निघाला.
आरोपी हा शेतशिवारातच दडला होता. ती माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली.
फॉरेन्सिक चमू दाखल
शुक्रवारी सकाळी न्यायवैद्यक विभागाची चमू आणि स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख अशोक लांडे यांनी घटनास्थळ गाठले आणि बारकाईने तपास सुरू केला. गळ्यात असलेल्या चांदीच्या तागडीनेच त्यांचा गळा आवळल्याचे निदर्शनास आले.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *