आरोग्य निर्देशांकात गोंदिया राज्यात ‘टॉप वन’!
डीएचओ मानांकनात ४६.५७ गुणांसह प्रथम क्रमांक; जिल्हा आरोग्य विभागाच्या सांघिक कामगिरीला यश
२९ ऑगस्ट रोजी पुण्यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांचा सन्मान
गोंदिया : राज्यस्तरावर दर तीन महिन्यांनी विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय आरोग्य कार्यक्रमांच्या उद्दिष्टपूर्तीच्या आधारे जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कामगिरीचे मानांकन केले जाते. पहिल्या तिमाहीतील सरासरी गुणांच्या आधारे करण्यात आलेल्या आरोग्य निर्देशांक क्रमवारीत गोंदिया जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावून ‘टॉप वन’ स्थान मिळविले आहे. गोंदिया जिल्हा आरोग्य विभागाला ४६.५७ गुण मिळाले आहेत.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल २९ ऑगस्ट रोजी पुणे येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात महाराष्ट्राचे आयुक्त (आरोग्य सेवा) तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक संजय काटकर (भा.प्र.से.) यांच्या हस्ते गोंदियाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संचालक (रुग्णालये आरोग्य सेवा, मुंबई) डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक (प्राथमिक आरोग्य केंद्रे, पुणे) डॉ. विजय कंदेवाड आणि नागपूर मंडळाचे आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर यांच्यासह राज्यस्तरीय प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
नागपूर दुसऱ्या, तर वर्धा तिसऱ्या क्रमांकावर
आरोग्य निर्देशांकाच्या मानांकनात गोंदियाने ४६.५७ गुणांसह अव्वल स्थान मिळवले आहे. या क्रमवारीत नागपूर ४५.७९ गुणांसह दुसऱ्या, वर्धा ४५.१७ गुणांसह तिसऱ्या, अकोला ४४.३९ गुणांसह चौथ्या, तर गडचिरोली ४४.१४ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी दिली.
माता-बाल आरोग्यापासून क्षयरोग नियंत्रणापर्यंत प्रभावी अंमलबजावणी
जिल्ह्यात माता व बालक आरोग्य, कुटुंब नियोजन, किशोरवयीन आरोग्य, विविध लसीकरण मोहिमा, आरसीएच ऑनलाईन पोर्टलवरील वेळेतील नोंदणी, क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, तसेच आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनीअंतर्गत मोफत आरोग्य तपासण्या यांसारख्या सर्वच राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली.
जिल्ह्यातील ४५ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, २६३ आरोग्य उपकेंद्रे, ४ ‘आपला दवाखाना’ आणि १७ नागरी आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांमार्फत नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. राष्ट्रीय कुटुंब नियोजन अभियान, संस्थात्मक सुरक्षित प्रसूती, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरचा पाठपुरावा, १०८ व १०२ रुग्णवाहिका सेवा आणि प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान या सर्व निकषांवर जिल्ह्याने उत्तम कामगिरी बजावली आहे.
नियोजनबद्ध कामकाज अन् सांघिक प्रयत्नांचे फलित
“गोंदिया हा महाराष्ट्राच्या सीमेलगतचा आदिवासी व जंगलव्याप्त भाग असून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अनेक जागा रिक्त असतानाही नियोजनबद्ध पद्धतीने काम करून हे यश मिळवले आहे,” अशा शब्दांत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी झेनिथ दोंतुला यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. जिल्हाधिकारी मंदार पत्की, मुख्य कार्यकारी अधिकारी झेनिथ दोंतुला, जि.प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर व उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश शक्य झाल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
नेपाळच्या पुरामध्ये अडकलेल्या ३ महिला सुरक्षित मायदेशी; मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
काठमांडूहून विमानाने दिल्ली व तेथून रेल्वेने नागपुरात आगमन
सेलू तालुक्यातील चार मंडळ येथील सुलोचना खापरे, इंदिरा चौधरी व वर्षा उपाध्याय सुखरूप
वर्धा : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराच्या भीषण परिस्थितीत अडकलेले भारतीय पर्यटक आता सुरक्षितपणे मायदेशी परतू लागले आहेत. याच क्रमाने काठमांडूहून विमानाने उड्डाण घेतलेले चार सदस्यीय पथक दिल्लीत पोहोचले आणि तेथून रेल्वेने नागपूरला सुखरूप पोहोचले. या पथकात वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील चार मंडळ गावच्या रहिवासी सुलोचना खापरे, त्यांची बहीण (नागपूर रहिवासी) इंदिरा चौधरी आणि मैत्रिण वर्षा उपाध्याय यांचा समावेश होता.
तिन्ही महिला शनिवारी सकाळी नागपूरला पोहोचून आपापल्या घरी सुरक्षित परतल्या. सुलोचना खापरे यांनी नेपाळ प्रवासाचा अनुभव सांगताना सांगितले, “आम्ही काठमांडूमध्ये मुक्कामी होतो व आसपासच्या परिसरात फिरण्यासाठी गेलो होतो. आम्ही पशुपतीनाथ मंदिराचे दर्शनही घेतले. सुरुवातीला आम्हाला तेथील पुराच्या गांभीर्याची कल्पना नव्हती. भारतातून फोन आल्यावरच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले व कुटुंबाची चिंता वाढली.”
कुटुंबीयांकडून वारंवार फोन आल्यानंतर आणि परिस्थितीची माहिती मिळताच चौघांनीही तातडीने भारतात परतण्याचा निर्णय घेतला.
विमान व रेल्वेने गाठले नागपूर
एका पर्यटकाची अचानक प्रकृती बिघडल्याने पथकाने रस्ते मार्गाने परतण्याऐवजी हवाई मार्ग निवडला. काठमांडूहून दिल्ली आणि तेथून रेल्वेद्वारे नागपूर असा प्रवास त्यांनी केला. त्यांच्या नातेवाईकांनी विमानाचे तिकीट बुक करून त्यांना सुरक्षित परत आणण्यास मदत केली.
मायदेशी पोहोचल्यानंतर तिन्ही महिलांनी महाराष्ट्र शासन आणि मुख्यमंत्र्यांचे उघड्या मनाने आभार मानले. “मुख्यमंत्री साहेब आणि राज्य सरकारने आम्हाला खूप मदत केली,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

