दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद; बकरीला सोडून कोंबडीच्या नादात अडकला पिंजऱ्यात!
गोरेगाव तालुक्यातील NNTR बफर झोनमधील घटना; वन विभागाच्या ‘आरआरटी’ पथकाचे यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन
गोरेगाव : नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राला (NNTR) लागून असलेल्या गोरेगाव तालुक्यातील बोडुंदा ग्राम व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दहशत निर्माण करणारा नरभक्षक प्रवृत्तीचा बिबट्या अखेर वन विभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. विशेष म्हणजे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बांधलेल्या बकरीकडे दुर्लक्ष करत, हा बिबट्या कोंबड्यांच्या मोहात पडला आणि थेट पिंजऱ्यात जाऊन अडकला. शुक्रवार, २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास हे थरारक रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीरीत्या पार पडले. बिबट्या जेरबंद झाल्याने संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांनी व गावकऱ्यांनी मोठा सुटकेचा निश्वास सोडला आहे.
गोरेगाव तालुक्यातील बोडुंदा हे गाव नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलाला लागून असून हा परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार सुरू होता. बिबट्याने गावातील अनेक बकऱ्या आणि कोंबड्यांवर हल्ले चढवून त्यांना आपले भक्ष्य बनवले होते. बिबट्याच्या वावरामुळे संध्याकाळ होताच संपूर्ण गावात भीतीचे सावट पसरायचे आणि शेतात अथवा घराबाहेर पडणेही नागरिकांना कठीण झाले होते. या गंभीर समस्येची दखल घेऊन गावकऱ्यांनी NNTR वन विभागाकडे बिबट्याला तातडीने जेरबंद करण्याची मागणी केली होती.
ट्रॅप कॅमेरे अन् दोन पिंजऱ्यांचा लावला सापळा!
गावकऱ्यांच्या मागणीचे गांभीर्य ओळखून NNTR चे वनाधिकारी आणि शीघ्र कृती दल (RRT) पथकाने संयुक्त शोधमोहीम हाती घेतली. परिसरात बिबट्याचा माग काढण्यासाठी दोन वेगवेगळ्या ठिकाणी पिंजरे लावले गेले आणि हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले. वन विभागाने एका पिंजऱ्यात सावज म्हणून बकरी, तर दुसऱ्या पिंजऱ्यात कोंबड्या ठेवल्या होत्या.
गुरुवार आणि शुक्रवारच्या मध्यरात्री बिबट्या भक्ष्याच्या शोधात गावात दाखल झाला. सुरुवातीला तो बकरी बांधलेल्या पिंजऱ्याजवळ आला; मात्र तिकडे न जाता तो शेजारीच कोंबड्या ठेवलेल्या पिंजऱ्यात शिकार करण्याच्या उद्देशाने आत शिरला. बिबट्या आत शिरताच पिंजऱ्याचे दार आपोआप बंद झाले आणि तो अलगद जाळ्यात अडकला.
बिबट्याला नैसर्गिक अधिवासात हलवले!
सकाळी बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. ‘आरआरटी’च्या विशेष पथकाने सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून बिबट्याला ताब्यात घेतले आणि आरोग्य तपासणीनंतर त्याला सुरक्षितपणे NNTR च्या नैसर्गिक अधिवासात (जंगल परिसरात) मुक्त करण्यासाठी नेले.
या पथकाने बजावली मोलाची कामगिरी
सदर यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन NNTR च्या वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) आयशा लांबट, क्षेत्र सहाय्यक एल. एस. अग्निहोत्री, वनरक्षक रंजीत पटले, पी. एस. बिसेन, हंगामी मजूर किशोर काले, उदय राऊत तसेच आरआरटीच्या पथकाने पार पाडले. या संपूर्ण मोहिमेत बोडुंदा गावातील महेश मारगाये, अनिल पटले, हितेश बिसेन आणि स्थानिक ग्रामस्थांनी वन विभागाला मोलाचे सहकार्य केले.

