LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

भद्रावती ड्रग्ज रॅकेटचे कनेक्शन थेट राजस्थानत; मुख्य सूत्रधार ‘टिपू’ला पाली जिल्ह्यातून बेड्या!

भद्रावती पोलीस अन् स्थानिक गुन्हे शाखेची आंतरराज्यात मोठी कारवाई; ड्रग माफियांचे धाबे दणाणले
भद्रावती (चंद्रपूर):
शहरातील अमली पदार्थांच्या काळ्या बाजाराविरोधात भद्रावती पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धडक कारवाई केली आहे. या आंतरराज्यीय ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे थेट राजस्थानपर्यंत पसरली असून, पोलिसांनी राजस्थानच्या पाली जिल्ह्यात धडक कारवाई करत मुख्य सूत्रधार आकिब जावेद ऊर्फ टिपू सलीम जावेद खान (वय ३० वर्ष, रा. मारवार जंक्शन, जि. पाली, राजस्थान) याला बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईमुळे आंतरराज्यीय ड्रग्ज तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ३ जून २०२६ रोजी भद्रावती येथील जमघट हॉटेलसमोरील खुल्या जागेत अमली पदार्थांची विक्री आणि वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी ‘एनडीपीएस’ कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सुरुवातीला अब्दुल सिराज अब्दुल गफ्फार या आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता, या संपूर्ण काळ्या धंद्याचा मुख्य सूत्रधार राजस्थानमधील ‘टिपू’ असल्याचे समोर आले.
तांत्रिक विश्लेषण आणि दोन दिवसांचा ट्रान्झिट वॉरंट
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ‘टिपू’चा या गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्यानंतर, भद्रावती पोलिसांचे विशेष पथक थेट राजस्थानला रवाना झाले. तिथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने १९ जून रोजी आरोपी टिपू खान याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेण्यात आले. राजस्थानच्या न्यायालयाने त्याला दोन दिवसांचा ट्रान्झिट वॉरंट मंजूर केला असून, त्याला भद्रावती येथे आणण्यात आले आहे. या कारवाईमुळे ड्रग्ज रॅकेटचे आणखी मोठे जाळे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पोलीस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनात धडक कारवाई
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अमोल काचोरे, भद्रावतीचे पो.नि. योगेश्वर पारधी, स्थागुशाचे सपोनि बलराम झाडोकर, पीएसआय संतोष केदार व त्यांच्या पथकातील अंमलदारांनी केली आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *