LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

चिंधीमाल जंगलात नरभक्षक वाघाची दहशत; तुकूम येथील ५५ वर्षीय शेतकऱ्याचा बळी

 परिसरात तीव्र संताप : नागभीड तालुक्यात खळबळ
नागभीड (चंद्रपूर) :
नागभीड जवळील तुकूम येथील ५५ वर्षीय शेतकरी गेल्या चार दिवसांपासून रहस्यमयरीत्या बेपत्ता होते. वनविभाग आणि गावकऱ्यांच्या संयुक्त शोधमोहिमेनंतर अखेर आज, बुधवारी चिंधीमाल जंगल परिसरात त्यांचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. मोरेश्‍वर गोपी सावसाकडे (वय ५५, रा. तुकूम) असे वाघाच्या प्राणघातक हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोरेश्वर सावसाकडे हे चार दिवसांपूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या शेतातील कामे करण्यासाठी घरातून निघाले होते. मात्र, सायंकाळ झाली तरी ते घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोधशोध सुरू केली; परंतु त्यांचा काहीही पत्ता लागला नाही. अखेर चिंताक्रांत कुटुंबीयांनी नागभीड पोलीस व वनविभागाला याबाबत माहिती दिली. सोमवारपासून वनविभागाचे कर्मचारी व गावकऱ्यांनी लगतच्या जंगल परिसरात संयुक्त कॉम्बिंग ऑपरेशन राबवले, तरीही मोरेश्वर यांचा सुगावा लागला नव्हता.
अखेर बुधवारी चिंधीमाल जंगल परिसरातून जाणाऱ्या काही गुराख्यांना तीव्र दुर्गंधी आली. त्यांनी वासाच्या दिशेने जाऊन पाहिले असता एका माणसाचा छिन्नविच्छिन्न मृतदेह दिसून आला. गुराख्यांनी त्वरित तुकूम येथील गावकऱ्यांना याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून वनपरिक्षेत्र अधिकारी भारती बगचारे यांनी आपल्या पथकासह व पोलिसांसह घटनास्थळ गाठले. मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असून, मोरेश्वर यांचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यातच झाल्याच्या भीषण वास्तवतेला वनविभागाने दुजोरा दिला आहे.
जंगलालगतच्या शेतात कामावर जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. संबंधित नरभक्षक वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि पीडित कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *