LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

लग्न जुळत नसल्याच्या नैराश्यातून २४ वर्षीय तरुणाची आत्महत्या

धमदीटोला येथील धक्कादायक घटना

गोंदिया: लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याच्या कारणावरून आलेल्या मानसिक दडपणातून एका २४ वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या धमदीटोला येथे २३ मार्च रोजी घडली. हेमंत प्रकाश मडावी (वय २४ वर्षे) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मृतक हेमंत मडावी याच्या मोठ्या भावाचे काही दिवसांपूर्वीच लग्न जुळले होते. मोठ्या भावाचे लग्न ठरल्याने घरात आनंदाचे वातावरण असताना, दुसरीकडे हेमंत मात्र स्वतःचे लग्न जुळत नसल्याने प्रचंड मानसिक तणावात होता. अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही मनासारखी मुलगी मिळत नसल्याने तो गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता. मोठ्या भावाचे लग्न ठरल्यापासून तो अधिकच चिडचिडा झाला होता आणि गेल्या दोन-तीन दिवसांपासून सतत रागाच्या भरात असायचा.अशातच, या मानसिक दडपणाचा कडेलोट झाल्याने २३ मार्च रोजी हेमंतने गावातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच गावकरी आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. याप्रकरणी मृतकाचे वडील प्रकाश मंगलदास मडावी यांनी चिचगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पित्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तरुण मुलाने अशा प्रकारे टोकाचे पाऊल उचलल्याने मडावी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. चिचगड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *