LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

भामरागडात वन्यजीव हल्ल्यातील १२ बाधितांना १९ लाख २५ हजारांची भरपाई!

आ. डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते धनादेशांचे वाटप
भामरागड :
वन्यजीवांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने आर्थिक आधार देण्यासाठी वनविभागाच्या वतीने १२ बाधितांना एकूण १९ लाख २५ हजार रुपयांच्या शासकीय नुकसानभरपाईचे धनादेश वितरीत करण्यात आले. आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते आणि प्रमुख वनाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भामरागड येथे हे धनादेश बाधितांना सुपूर्द करण्यात आले.
वन्यजीवांच्या हल्ल्यात गंभीर तसेच किरकोळ जखमी झालेल्या नागरिकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करून शासनाकडून ही नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली होती. मंजूर झालेली १९ लाख २५ हजार रुपयांची मदत थेट धनादेशाच्या माध्यमातून १२ लाभार्थ्यांना सुपूर्द करण्यात आली. या प्रसंगी बोलताना आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम म्हणाले की, मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी शासन आणि वनविभाग कटिबद्ध आहे. वन्यजीवांच्या हल्ल्यामुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या पाठीशी प्रशासन खंबीरपणे उभे असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, वनपरिक्षेत्र अधिकारी अमर हणमंत भिसे आणि योगेश शेरकर यांनी नागरिकांना जंगलालगतच्या भागात शेतीची कामे करताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले. रात्रीच्या वेळी एकट्याने फिरणे टाळावे तसेच परिसरात वन्यप्राणी आढळल्यास तातडीने वनविभागाला माहिती द्यावी, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी शुभम पाटील, तहसीलदार किशोर बागडे, वनपरिक्षेत्र अधिकारी अमर भिसे, योगेश शेरकर, मुख्याधिकारी अभिजित सोनवणे, वनपाल महेश खोब्रागडे, वनरक्षक माधुरी तलांडे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच, बाधित शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *