LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

बोदलझिरा येथून पळून डोंगरतालात दहशत माजवणारी वाघीण जाळ्यात

ड्रोन अन् डार्टचा दणका, पण वाघिणीची रवानगी कुठं?
नागपूर : 
देवलापारजवळील डोंगरताल परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या आणि उच्छाद मांडणाऱ्या ‘TUI21’ कोडच्या वादग्रस्त वाघिणीला अखेर वनविभागाने पुन्हा एकदा जेरबंद केले आहे. यापूर्वी या वाघिणीला रेस्क्यू करून अवघ्या १४ किलोमीटर अंतरावरील बोदलझिरा परिसरात सोडण्यात आले होते. मात्र, वनविभागाचा तो तोकडा प्रयोग पार फसला आणि ही वाघीण पुन्हा आपल्या जुन्याच डोंगरताल भागात परतली. परतल्यानंतर तिने शिकारीचे सत्र सुरू केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड घबराट अन् तीव्र संतापाची लाट पसरली होती.
वनविभागाला या वाघिणीवर कारवाई करण्यासाठी १० ऑगस्टपर्यंतचीच मुदत/परवानगी मिळाली होती. मुदतीच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच १० ऑगस्ट रोजी दुपारनंतर वनविभागाने तातडीने हालचाली करत वाघिणीला जाळ्यात ओढले. सुरुवातीला डोंगरताल येथे लावण्यात आलेला पिंजरा वाघिणीचे लोकेशन बदलल्याने उसरीपार जंगल परिसरात हलवण्यात आला. वनविभागाच्या पथकाने ड्रोन कॅमेऱ्यांच्या साहाय्याने वाघिणीच्या प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवली. योग्य लोकेशन मिळताच ट्रॅन्क्विलायझर डार्ट (बेशुद्धाचे इंजेक्शन) मारून तिला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले.
मात्र, ही संपूर्ण मोहीम पार पाडताना वनविभागाने बाळगलेल्या अत्यंत अति-गोपनीय पद्धतीमुळे आश्चर्य आणि संशय व्यक्त केला जात आहे. ही धडक कारवाई नेमकी कोणाच्या नेतृत्वाखाली झाली आणि जेरबंद केल्यानंतर या वादग्रस्त वाघिणीला नक्की कुठे हलवण्यात आले, याबाबत वनविभागाने कोणतीही अधिकृत माहिती स्पष्ट केलेली नाही. यापूर्वी अवघ्या १४ किमी अंतरावर सोडल्यामुळे वाघीण पुन्हा मानवी वस्तीजवळ परतली होती; त्यामुळे आता तिची रवानगी नक्की कुठे केली जाणार, याकडे संपूर्ण परिसराचे आणि वन्यजीवप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *