तांब्याची तार चोरणारा आरोपी जेरबंद; ६.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त!
डुग्गीपार ठाण्यांतर्गत कोहमारा व नवेगावबांध येथील दुकानांतील चोऱ्यांचा पर्दाफाश
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; २१० किलो तांब्याची तार आणि कार जप्त
गोंदिया : डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोहमारा येथील हार्डवेयर दुकानाचे कुलूप तोडून तांब्याची तार लांबवणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून चोरीस गेलेली २१० किलो तांब्याची तार आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण ६ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान आरोपीने नवेगावबांध टी-पॉइंट येथील अन्य एका हार्डवेयर दुकानातही चोरी केल्याची कबुली दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोहमारा येथील रहिवासी नंदकिशोर खुशाल कापगते (३८) यांनी त्यांच्या मोटरपंप विक्री व रिवाइंडिंगच्या दुकानाचे कुलूप तोडून सुमारे १०० किलो तांब्याची तार आणि रोख रक्कमेसह एकूण ६० हजार रुपयांचा माल चोरी गेल्याची तक्रार डुग्गीपार पोलीस ठाण्यात नोंदवली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांना प्रकरणाचा शोध घेण्याचे निर्देश दिले.
यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला. ९ ऑगस्ट रोजी पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, या चोरीत भंडारा जिल्ह्यातील अर्जुनी पुनर्वसन/गिरोला येथील रहिवासी अविनाश विजय राघोर्ते (२९) आणि त्याचे साथीदार सहभागी आहेत. पोलिसांनी भंडारा येथून अविनाशला ताब्यात घेऊन विचारपूस केली.
कडक चौकशी केली असता त्याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने कोहमारा येथील हार्डवेयर दुकान आणि नवेगावबांध टी-पॉइंट येथील संजय हार्डवेयर दुकानात चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीकडून पोलिसांनी १ लाख १६ हजार रुपये किमतीची २१० किलो तांब्याची तार आणि ५ लाख रुपये किमतीची चारचाकी गाडी असा एकूण ६ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपीला पुढील तपासासाठी डुग्गीपार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे आणि त्यांच्या पथकाने केली.

