नराधमाला फाशी द्या, म्हणत विद्यार्थी रस्त्यावर!
‘शाळा बंद’ला प्रतिसाद देत विद्यार्थी आंदोलनात : व्यक्त केला आक्रोश, विद्यार्थ्यांसोबतच युवक आणि महिलांचाही मोठा सहभाग
भंडारा शहरात संतापाची लाट; त्रिमूर्ती चौकात पोलिसांकडून मोर्चा अडवला
भंडारा (८ ऑगस्ट) : बलात्काऱ्याला फाशी द्या, आम्हाला सुरक्षा द्या, अशा संतप्त घोषणा देत भंडाऱ्यातील ‘मिलेनियल, जेन झी’ आणि महिला शुक्रवारी (७ ऑगस्ट) रस्त्यावर उतरल्या. सामाजिक संघटनांनी केलेल्या ‘शाळा बंद’च्या आवाहनाला प्रतिसाद देत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलिसांनी त्रिमूर्ती चौकात मोर्चा अडविल्यावर विद्यार्थ्यांची सभा झाली. अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी तेथे येऊन मोर्चातील विद्यार्थ्यांच्या भावना जाणून घेतल्या.
शहरातील आंबेडकर वॉर्डातील अंगणवाडीच्या स्वच्छतागृहात एका साडेतीन वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या प्रयत्नाच्या घटनेचे शुक्रवारी शहरात संतप्त पडसाद उमटले. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालयात संतप्त जमाव ठिय्या देऊन होता. आरोपीवर तातडीने कारवाई करा, अशी मागणी करीत सामाजिक संघटनांनी शुक्रवारी शहरात शाळा बंदची आणि आंदोलनाची हाक दिली होती. त्याला मोठा प्रतिसाद मिळालेला दिसला. मोठ्या संख्येने विद्यार्थी गांधी चौकात गोळा झाले. तेथून घोषणा देत निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
पोलिसांनी तो त्रिमूर्ती चौकात अडविल्यावर विद्यार्थ्यांनी भाषणांतून संताप व्यक्त करीत सुरक्षेची मागणी केली. विशेषतः विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय होती. तरुणांसह महिलांचाही या मोर्चामध्ये सहभाग होता. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. बॅरिकेट्स लावून त्रिमूर्ती चौकाकडून येणारा मार्गही आंदोलनादरम्यान बंद ठेवला होता.
भाषणांतून व्यक्त केला संताप
“मुली सुरक्षित नाही, गावगुंडांना आवरा, पोलिसांना कळूनही बसस्थानकावरील उपद्रव कमी होत नाही, बसस्थानकावर बसच्या प्रतीक्षेत असताना आमचे मोबाईलमधून फोटो काढले जातात, अशा असंख्य समस्या,” विद्यार्थिनींनी संतप्तपणे भाषणांतून मांडल्या. “आम्हाला न्याय मिळणार की नाही,” असा प्रश्न त्यांनी पोलिसांना विचारला.
विविध संघटनांकडून प्रशासनाला निवेदन
बालिकेवरील अत्याचाराच्या प्रयत्नाच्या घटनेबद्दल अनेक संघटनांकडून संताप व्यक्त करण्यात आला. अनेक संघटना, राजकीय पक्षांच्या शिष्टमंडळांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. आरोपीला फाशीची शिक्षा द्या, लवकरात लवकर कारवाई करा, अशी मागणी अनेकांनी केली.
पोलीस अधिकाऱ्यांनी येऊन स्वीकारले निवेदन
अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी चौकातील निदर्शनस्थळी येऊन विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांचे निवेदन स्वीकारले. आरोपीला अधिकाधिक कठोर शिक्षेसाठी प्रयत्न करण्याचे आणि फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यांच्यावर विद्यार्थ्यांनी असंख्य प्रश्नांचा भडीमार करून समस्या मांडल्या.
राज्यव्यापी बालसुरक्षा कृती आराखडा राबवा : नीलम गोऱ्हे
येथे अवघ्या तीन वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचाराच्या घटनेची गंभीर दखल घेत शिवसेना नेत्या तथा विधान परिषदेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्याचे पोलीस महासंचालकांना निवेदन पाठवून आदर्शवत कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यासह लागू असलेल्या सर्व कठोर तरतुदींचा वापर करून विशेष सरकारी अभियोक्त्याची नियुक्ती करावी, खटला फास्ट ट्रॅक विशेष न्यायालयात चालविण्यासाठी आवश्यक समन्वय साधावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये ‘शून्य विलंब, शून्य हलगरजी आणि शून्य सहनशीलता’ या तत्त्वावर तपास करण्याचे निर्देश देण्याची मागणी त्यांनी केली.

