LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

गुन्हे मागे घ्या, अन्यथा सर्वांनाच अटक करा; १३ गावांतील शेतकरी रस्त्यावर!

आष्टीत रोष अन् संताप : तीन मार्ग रोखल्याने वाहतुकीची कोंडी, प्रशासकीय अधिकाऱ्यांची धावपळ
वरद फेरो कंपनीच्या ड्रोन सर्वेक्षणावरून वाद; ९ तासांपासून शेतकऱ्यांचे आष्टी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन
आष्टी (गडचिरोली) :
जिल्हा प्रशासनाने भूमिअधिग्रहण प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर ९ जुलै रोजी वरद फेरो कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ड्रोनद्वारे सर्वेक्षणाचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी तिघांना पकडून ग्रामपंचायतीत कोंडले होते. या प्रकरणी सात शेतकऱ्यांसह इतर ३० ते ४० जणांवर गुन्हा नोंदविल्याची नोटीस धडकल्याने गावकऱ्यांना हादरा बसला. संतप्त शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत आष्टी पोलीस ठाण्यात धडक दिली व नंतर मुख्य चौकात ठिय्या दिला. ‘शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्या अन्यथा सर्वांनाच अटक करा’, अशा भूमिकेवर ठाम असलेल्या आंदोलकांनी प्रशासनाला अक्षरशः घाम फोडला.
मुधोली चक क्र. २ येथे ९ जुलै रोजी ‘वरद फेरो’च्या कर्मचाऱ्यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले होते. त्यावेळी तिघांना ग्रामस्थांनी पकडून ठेवले होते. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर त्यांची सुटका झाली. त्यांच्यावर बेकायदेशीर ड्रोन उडविल्याप्रकरणी गुन्हाही नोंदविला. मात्र, ग्रामपंचायतीत डांबल्याच्या आरोपावरून वरद फेरोच्या कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून सात शेतकऱ्यांसह अज्ञात ३० ते ४० जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान, ७ ऑगस्ट रोजी या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्यासंदर्भात नोटीस आली. त्यानंतर मुधोलीसह १३ गावचे शेतकरी ठाण्यात पोहोचले.
रुग्णवाहिकेला दिली वाट मोकळी करून
शेतकऱ्यांनी प्रशासनाबद्दल रोष दाखवित संतप्त भावना व्यक्त केल्या. यावढेली माणुसकी व संयमही दाखविला. तिन्ही मार्गांवरील वाहने रोखून धरल्यानंतर अचानक आलेल्या रुग्णवाहिका तसेच खासगी वाहनातून आलेल्या रुग्णांना स्वतःहून वाट मोकळी करून देत मार्गस्थ केले. शेतकऱ्यांनी दाखविलेल्या या प्रसंगवधानाची आंदोलनस्थळी चर्चा होती. आंदोलनात महिलांचा लक्षणीय सहभाग होता. युवक व विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी होते.
आंदोलनस्थळीच जेवण व पाण्याची व्यवस्था
दुपारी साडेबारा ते साडेतीन पोलीस ठाण्यात ठिय्या दिला तर दुपारी साडेतीन वाजेपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन सुरू आहे. या दरम्यान आंदोलक शेतकऱ्यांनी स्वतःच पाणी व जेवणाची व्यवस्था केली. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आमदार नरोटे, एसपींकडून मनधरणी
शेतकऱ्यांशी आमदार डॉ. मिलिंद नरोटे व पोलीस अधीक्षक एम. रमेश यांचा फोनवरून संवाद सुरू होता. मात्र, गुन्हे मागे घेतल्याशिवाय एकही शेतकरी हलणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती. दुसरीकडे चामोर्शीचे तहसीलदार हेमंत गांगुर्डे, उपअधीक्षक हेमंत चांदेवार यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी हे आंदोलनस्थळी ठाण मांडून होते.
…तर जेलभरो आंदोलन
“शेतजमीन हेच शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे मुख्य साधन आहे. जमीन गेल्यास त्यांचा आधार हिरावला जाईल. शेतकरी आपल्या हक्कासाठी लढत आहेत. गुन्हे नोंदवून प्रशासन कुटील डाव खेळत आहे. गुन्हे मागे न घेतल्यास हजारो शेतकऱ्यांसह जेलभरो आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा काँग्रेस माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिला आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *