LatestNewsगुन्हेवार्तागोंदियामहाराष्ट्र

गोंदियात मोपेडच्या डिक्कीतून गांजाची तस्करी; शहर पोलिसांचा डब्लिंग मैदानात सर्जिकल स्ट्राईक

मोनु खानला दीड लाखांच्या मुद्देमालासह बेड्या!
गोंदिया :
  आगामी सण-उत्सवांच्या काळात गोंदिया शहरात अंमली पदार्थांचे जाळे पसरवणाऱ्या तस्करांविरुद्ध गोंदिया शहर पोलिसांनी धडक कारवाईचे सत्र सुरू ठेवले आहे. मोपेडच्या डिक्कीत बेकायदेशीररीत्या गांजा लपवून विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या एका सराईत तस्कराला पोलिसांनी सापळा रचून रंगेहात जेरबंद केले. डब्लिंग मैदान परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी १ किलो ०.११ ग्रॅम ओला गांजा आणि तस्करीसाठी वापरलेली दुचाकी असा एकूण १ लाख ५० हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, तस्करांच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
दिनांक २६ ऑक्टोबर रोजी पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांचे पथक शहरात अवैध धंद्यांवर कारवाईसाठी गस्त घालत होते. त्याच वेळी मिलन सभागृह ते डब्लिंग कॉलनीकडे एका राखाडी (ग्रे) रंगाच्या मोपेडवरून एक इसम मोठ्या प्रमाणावर गांजा घेऊन येणार असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता शासकीय पंच, छायाचित्रकार आणि वजन काट्यासह डब्लिंग मैदान परिसरात गुप्त नाकाबंदी केली. काही वेळातच संशयित इसम ज्युपिटर मोपेडवरून येताना दिसताच पथकाने त्याला चोहोबाजूने घेरून ताब्यात घेतले. विचारपूस केली असता, त्याने आपले नाव मोसीन ऊर्फ मोनु खान मुस्ताक खान (वय २९ वर्षे, रा. जयपुरिया हॉस्पिटलजवळ, सिव्हिल लाईन, गोंदिया) असे सांगितले.
पोलिसांनी पंचांसमक्ष त्याच्या वाहनाची कसून तपासणी केली असता, मोपेडच्या डिक्कीत लाल रंगाची एक संशयास्पद प्लास्टिक पिशवी आढळली. ती उघडून पाहिली असता, त्यात पाने, फुले आणि बिया असलेला हिरवा ओलसर गांजा भरलेला दिसून आला. शासकीय वजन काट्यावर मोजणी केली असता ५० हजार ५५० रुपये किमतीचा १ किलो ०.११ ग्रॅम गांजा निष्पन्न झाला. पोलिसांनी गांज्यासह १ लाख रुपये किमतीची टीव्हीएस ज्युपिटर मोपेड (क्रमांक एम.एच.३५/ए.यु.-९२४२) असा एकूण १,५०,५५० रुपयांचा मुद्देमाल जागीच जप्त केला.
याप्रकरणी आरोपी मोसीन ऊर्फ मोनु खानविरुद्ध गोंदिया शहर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये (NDPS Act कलम ८(क), २०(ब), २९; गुन्हा क्र. ९४३/२०२६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली शहरचे पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे, डीबी पथकाचे सपोनि वैभव गेडाम, सपोनि संदीप मडावी, मपोउपनि प्रियंका बैस, सफौ कवलपालसिंग भाटिया, पोहवा सुदेश टेंभरे, निशीकांत लोंदासे, कमलेश शहारे तसेच पोशि दिनेश बिसेन, सुभाष सोनवाने, अशोक रहांगडाले, मुकेश रावते, प्रमोद शेंडे, सोनु नागपुरे, राकेश बंजारे, अजय बोपचे व राकेश डोंगरवार यांनी पार पाडली. या गांजा तस्करीचे धागेदोरे कोठपर्यंत पोहोचले आहेत, याचा पुढील तपास मपोउपनि प्रियंका बैस करत आहेत.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *