पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या उपस्थितीत जि.प. व नगर परिषदेच्या कामांचा आढावा
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा; निधीअभावी रखडलेल्या योजनांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवा – पालकमंत्रींचे निर्देश
गोंदिया : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनिमित्त गोंदिया दौऱ्यावर आलेले जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गोंदिया जिल्हा परिषद व गोंदिया नगर परिषदेच्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीस खासदार राजेंद्र जैन, आमदार राजकुमार बडोले, संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी, नगरसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.बैठकीदरम्यान लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघातील विविध समस्या, विकासकामांत येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि निधीअभावी रखडलेल्या प्रकल्पांचा पाढा पालकमंत्र्यांसमोर मांडला. यावर पालकमंत्री नाईक व खासदार राजेंद्र जैन यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना जनतेशी निगडित प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आणि रखडलेल्या योजनांचे प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्याचे निर्देश दिले.७ वर्षांपासून रखडलेल्या ‘ऑडिटोरियम’चे काम मार्गी लावणारबैठकीत गोंदिया शहरातील मागील सात वर्षांपासून रखडलेल्या सांस्कृतिक भवनाच्या (ऑडिटोरियम) बांधकामाचा मुद्दा गांभीर्याने उपस्थित करण्यात आला. पुरेसा निधी उपलब्ध असूनही केवळ तांत्रिक कारणांमुळे काम रेंगाळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगताच, पालकमंत्र्यांनी यावर फेरनिविदा (री-टेंडर) प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून इमारतीचे काम जलद गतीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.याशिवाय गोंदिया शहरातील मुख्य बाजारपेठेचे स्थलांतर करणे, विविध भागात सार्वजनिक शौचालयांची उभारणी, नगर परिषद शाळांच्या इमारतींचे नूतनीकरण व बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी जागा व निधीची उपलब्धता आणि नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीस मंजुरी देण्याबाबत चर्चा झाली. या सर्व प्रस्तावांवर प्रशासनाने प्राधान्याने कार्यवाही करावी, असे निर्देश लोकप्रतिनिधींनी दिले.घरकुल योजनांसाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणीजिल्हा परिषद सदस्यांनी ग्रामीण भागातील आरोग्य, शिक्षण व गृहनिर्माण योजनांमधील अडचणींकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. गृहनिर्माण विभागातील स्थापत्य सहाय्यकांची संख्या कमी केल्यास ‘प्रधानमंत्री आवास’ व इतर घरकुल योजनांच्या अंमलबजावणीवर प्रतिकूल परिणाम होईल, त्यामुळे कर्मचारी कमी न करता त्यांची संख्या वाढवण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली.यासोबतच कटंगी कला येथे आदिवासी समाजाचे क्रांतीपुरुष स्व. नारायणसिंह उईके यांचा पुतळा उभारण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला. सर्व विभागांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवून विकासकामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावीत, असे आवाहन बैठकीच्या शेवटी पालकमंत्री नाईक यांनी केले.

