LatestNewsगोंदिया- भंडारा

सावलीतील पेट्रोल पॅम्पवर ट्रक-ट्रॅक्टरच्या बॅटरी चोरी; एलसीबीकडून दोन चोरांसह कबाडी दुकानदाराला ठोकल्या बेड्या!

७ बॅटऱ्यांसह ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त; सालेकसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारवाई
सालेकसा/गोंदिया:
आमगाव ते देवरी मार्गावरील सावली येथील पेट्रोल पॅम्पजवळ उभ्या असलेल्या ट्रक आणि ट्रॅक्टरमधून बॅटऱ्या पळवणाऱ्या दोन अट्टल चोरांना स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्यासोबत चोरीचा माल खरेदी करणाऱ्या फुलचूर येथील कबाडी दुकानदारालाही पोलिसांनी अटक केली असून, आरोपींकडून ३७ हजार रुपये किमतीच्या ७ बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत.
अतीष शंकर रहांगडाले (वय ३१, रा. छोटा गोंदिया), ऋत्विक बस्तीराम कंटकार (वय २५, रा. छोटा गोंदिया) आणि चोरीचा माल घेणारा कबाडी व्यावसायिक कैलास संजय चौधरी (वय ३५, रा. प्रिन्स चौक, फुलचूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
भाड्याच्या गाडीने फिरून केली चोरी
कॉमेन्द्र खेमराज मेंढे (रा. डोंगरगाव, जि. गोंदिया) यांनी सालेकसा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती की, २ ते ३ ऑगस्टच्या मध्यरात्री सलोनी (काळे) पेट्रोल पॅम्प, सावली येथे ठेवलेल्या ३ ट्रक आणि १ ट्रॅक्टरमधून अज्ञात चोराने ७ बॅटऱ्या पळवल्या. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत असताना एलसीबीला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अतीष रहांगडाले व ऋत्विक कंटकार यांना ताब्यात घेण्यात आले. कडक चौकशी केली असता, त्यांनी एक चारचाकी वाहन भाड्याने घेऊन ते स्वतः चालवत सावली येथील पेट्रोल पॅम्पवरून ७ बॅटऱ्या चोरल्याची आणि त्या फुलचूर येथील कैलास चौधरी याच्या कबाडी दुकानात विकल्याची कबुली दिली.
३७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
पोलिसांनी कबाडी दुकानावर धाड टाकून चोरीला गेलेल्या सर्व ७ बॅटऱ्या जप्त केल्या. यामध्ये:
२२ हजार रुपये किमतीच्या ४ अमरॉन कंपनीच्या बॅटऱ्या
६ हजार रुपयांची १ पॉवरजोन कंपनीची बॅटरी
५ हजार रुपयांची १ एस. एफ. कंपनीची बॅटरी
४ हजार रुपयांची १ स्टिकर नसलेली बॅटरी
असा एकूण ३७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून तिन्ही आरोपींना मुद्देमालासह पुढील कायदेशीर कारवाईसाठी सालेकसा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
तपास पथकाची धडक कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या सूचनेनुसार आणि एलसीबीचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा सुबोधकुमार बिसेन, विठ्ठल ठाकरे, दीक्षितकुमार दमाहे, संजय चौहान, पोशि हंसराज भांडारकर, छगन विठ्ठले आणि चालक पोशि राम खंदारे यांनी केली आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *