नात्याला काळिमा! सख्ख्या भावानेच केला लहान भावाचा खून…
हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कटंगधरा येथील धक्कादायक घटना
हिंगणा (नागपूर): कामधंदा करत नसल्यामुळे नेहमी टोचून बोलणाऱ्या सख्ख्या लहान भावाचा, बेरोजगार मोठ्या भावाने झोपेत असताना डोक्यावर लाकडी दांडक्याने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कटंगधरा येथे शनिवारी (दि. २३) रात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडली.
शुभम बाबुलाल पंधराम (वय २८, रा. कटंगधरा, पो. आमगाव देवळी, जि. नागपूर) असे खून झालेल्या लहान भावाचे नाव आहे. तर, हरिश्चंद्र बाबुलाल पंधराम (वय ३४) असे आरोपी मोठ्या भावाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही भाऊ आपले वडील बाबुलाल आणि आई राईबाई यांच्यासोबत एकत्र राहत होते. आरोपी हरिश्चंद्र याचे लग्न झालेले नव्हते आणि तो कोणतेही काम करत नव्हता. दुसरीकडे, लहान भाऊ शुभम हा काम करून संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. शुभमचा चार वर्षांपूर्वी विवाह झाला होता, मात्र पत्नीसोबत त्याचा घटस्फोट झाला होता.
मोठ्या भावानेही काहीतरी काम करून घरखर्चात वाटा उचलावा, असे शुभमला वाटत होते. त्यामुळे तो नेहमीच आपल्या मोठ्या भावाला काम करण्यासाठी समजावत असे. याच कारणावरून शुक्रवारी (दि. २२) काम करण्यावरून दोन्ही भावांमध्ये पुन्हा वाद झाला. या वादानंतर वडील बाबुलाल यांनी रागावून हरिश्चंद्रला घराबाहेर जाण्यास सांगितले.
झोपेत असताना केला प्राणघातक हल्ला:
रात्रीच्या वेळी बाबुलाल, त्यांची पत्नी राईबाई आणि लहान मुलगा शुभम हे अंगणात झोपले होते. दरम्यान, शनिवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास हरिश्चंद्र घरी आला. शुभम कामावरून नेहमी बोलत असल्याचा राग हरिश्चंद्रच्या मनात धुमसत होता. याच रागाच्या भरात त्याने अंगणात गाढ झोपेत असलेल्या शुभमच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने जोरदार वार केले आणि त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडले. या भीषण हल्ल्यात शुभमचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शुभमची आई राईबाई यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगणा पोलिसांनी आरोपी हरिश्चंद्र विरुद्ध कलम १०३ (१) नुसार गुन्हा दाखल केला असून, त्याला तात्काळ अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हिंगणा पोलीस करत आहेत.

