LatestNewsगोंदिया- भंडारारोजगारविदर्भ

टीसीएस कंपनीत निवड झालेल्या नमाद महाविद्यालयाच्या ४६ विद्यार्थ्यांचा सत्कार

गोंदिया (प्रतिनिधी) – टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस (टीसीएस) या कंपनीत निवड झालेल्या नमाद महाविद्यालयाच्या ४६ विद्यार्थ्यांचा गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात महाविद्यालयाच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला.गोंदिया जिल्ह्यातील सर्वात जुने आणि विश्वसनीय असलेल्या येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात संस्थेचे मार्गदर्शक प्रफुल पटेल, अध्यक्षा वर्षा पटेल, सचिव राजेंद्र जैन, संचालक निखिल जैन यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थी हिताचे अनेक प्रयोग, उपक्रम राबविले जातात. रोजगारक्षम विद्यार्थी संस्थेतून बाहेर पडावेत, यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस (टीसीएस) ही देशातील अग्रगण्य नामांकित कंपनी आहे. या कंपनीत काम करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. याच कंपनीने नुकताच प्राचार्य डॉ. रवींद्र मोहतुरे यांच्या नेतृत्वात नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात रोजगार मेळावा आयोजित केला होता. २०२४, २०२५ या शैक्षणिक सत्रात उत्तीर्ण झालेले आणि २०२६ या शैक्षणिक सत्रात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोजगार मेळाव्यात सहभागी झाले. निवड चाचणी लिखित परीक्षा आणि मुलाखत अशा दोन पातळीवर घेण्यात आली. या रोजगार मेळाव्यात ४६ विद्यार्थ्यांची व्यवसाय प्रक्रिया सेवा (बीपीएस) या पदासाठी निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची नागपूर मिहान येथे नियुक्ती देण्यात येणार आहे. महाविद्यालयात घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात ४६ विद्यार्थ्यांची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र मोहतुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मेहनत. विश्वास, धैर्य ठेवून सातत्याने काम करावे आणि आपल्या आई वडिलांचा सोबतच महाविद्यालयाचा नावलौकिक करावा, असा सल्ला या प्रसंगी प्राचार्य मोहतुरे यांनी विद्यार्थ्यांना दिला. टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस (टीसीएस) तर्फे अर्पित रहमतकर, आशय मेश्राम, सैफ अहमद, धीरज पेटकर यांनी निवड प्रक्रिया पूर्ण केली. नमाद महाविद्यालयाच्या ट्रेनिंग प्लेसमेंट कक्षाचे डॉ. भावेश जसानी, मानव्य विद्या शाखा प्रमुख डॉ. एच पी पारधी, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. अंबादास बाकरे, डॉ. विराज वेलतूरकर, डॉ. रत्ना विश्वास, प्रा. सौरभ चेटुले, प्रा. तारेंद्र पटले, प्रा. नरेश भुरे, प्रा. गणेश राव यावेळी उपस्थित होते.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *