st bus : एसटीचालक मद्य प्राशन करून आढळल्यास होणार कारवाई
मद्यपी बसचालकाला ओळखणार ‘ब्रेथ अॅनालायझर’
गोंदिया : डिजिटल युगात देशात नवनवे तंत्रज्ञान विकसित होत असून, ते झपाट्याने शहरापासून ते खेड्यांपर्यंत पोहोचत आहेत. आता एसटी महामंडळाने (st bus) नवीनच तंत्रज्ञान विकसित केले असून, आता बसचालक दारू पिऊन बस चालवित असेल तर बसमधील नव्याने विकसित झालेले यंत्र सांगणार आहे. तसेच बसचे इंजीनसुद्धा सुरूच होणार नसल्याचे सांगितले जात आहे.
(st bus) एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणखी एक पाऊल उचलले आहे. एसटीच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या नव्या बसेसमध्ये ‘ब्रेथ अॅनालायझर’ यंत्र
बसविले जाणार असून चालकाने दारू सेवन केली आहे किंवा नाही हे यंत्र सांगणार आहे. चालकाला बस चालू करण्यापूर्वीच या यंत्राद्वारे चाचणी द्यावी लागणार असून त्याने दारू सेवन केली असल्यास एसटीचे इंजीन सुरूच होणार नाही. ‘प्रवाशांच्या सुरक्षित सेवेसाठी’चा संकल्प करीत पहिली एसटी मार्गस्थ करण्यात आली होती. त्यास ७५ वर्षे होऊन गेली. कालानुरूप प्रवाशांच्या सेवेसाठी अनेक आधुनिक सुविधा एसटीने (st bus) स्वीकारल्या. अनेक स्थित्यंतरे पाहिली. अनेक अडचणींचा सामना करीत अद्यापही एसटी सर्वदूर पोहोचत आहे. सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी आजही एसटीच पहिली पसंती आहे. शासनही प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विविध उपायायोजना राबवित आहेत.
प्रवाशांसाठी नवनवीन योजना आणत असते. यात विद्यार्थिनींसाठी साठी मोफत पास, महिलांसाठी ५० टक्के भाडे सवलत, ज्येष्ठांसाठी मोफत प्रवास, अशा काही ठळक योजना एसटी महामंडळाच्या आहेत. येत्या साधारण वर्षभरात एसटीच्या ताफ्यात राज्यभर आठ हजार बसेस नव्याने दाखल करण्याची प्रक्रिया राज्य परिवहन विभागाने सुरू केली आहे. या सर्व बसेस खरेदीच्या प्रक्रियेत प्रवाशांच्या सुरक्षेबाबत दक्षता घेण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि एसटीवरील विश्वास आणखी वाढेल.
……………………………….
‘ब्रेथ अॅनालायड़ार’ काम कसे करते ?
‘ब्रेथ अॅनालायझर’ हे एक इलेक्ट्रिक यंत्र असून त्यात सेन्सर्स आहेत. चालकाने बस सुरू करण्यापूर्वी त्यात फुंकर मारल्यास त्यातील सेन्सर्स रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण मोजते. अल्कोहोलचे मर्यादेपेक्षा अधिक प्रमाण आढळल्यास ते यंत्र फेल असा सिग्नल देते. त्यामुळे इंजीन आपोआप लॉक होईल. चालकाला एसटी चालविण्याची परवानगी मिळणार नाही. ही माहिती नियंत्रण कक्षाला स्वयंचलितरीत्या नोंदविली जाईल. यामुळे चालकावर निलंबनाची किंवा शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते.
…………………………….
बसचालकांना चाचणी अनिवार्य
एसटी बस चालू करण्यापूर्वी चालकांना ‘ब्रेथ अॅनालायझर’ची चाचणी अनिवार्य असणार आहे. त्यांना प्रथम ‘बेथ अॅनालायझर’ मध्ये फुंकर मारावी लागणार आहे. यंत्राकडून योग्य सिग्नल मिळाल्याशिवाय बसचे इंजीनच सुरू होणार नाही. यामुळे चालकांना या बस सुरू करताना या चाचणीला सामोरे जावे लागणार आहे.
00000000000

