LatestNewsगोंदियाविदर्भ

रेती वाहतूक करणाऱ्या जड-अवजड वाहनांवर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्बंध!

सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ४ ते रात्री ९ दरम्यान ‘नो एन्ट्री’

गोंदिया : रावणवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डांगोर्ली, किन्ही आणि तेढवा रेतीघाटांतून गोंदिया शहराकडे धावणाऱ्या जड-अवजड वाहनांमुळे वाढणारे अपघात, होणारी वाहतूक कोंडी आणि निर्माण होणारा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. जिल्हादंडाधिकारी मंदार पत्की यांनी मोटार वाहन कायद्यान्वये विशेष अधिकार वापरून या मार्गांवरून होणाऱ्या रेती वाहतुकीवर वेळेचे कडक निर्बंध लादले आहेत. त्यानुसार दिवसाच्या गर्दीच्या वेळी टिप्पर व जड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.सविस्तर असे की, डांगोर्ली, किन्ही आणि तेढवा येथील रेतीघाटांवरून दासगाव–निलज–पांढराबोडी मार्गे मोठ्या प्रमाणावर रेतीची वाहतूक गोंदिया शहराकडे केली जाते. या मार्गावरून भरधाव वेगाने धावणाऱ्या ६ चाकी, १० चाकी व १२ चाकी टिप्पर तसेच इतर अवजड वाहनांमुळे शाळकरी विद्यार्थी, शेतात जाणारे शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता. वारंवार होणारे अपघात आणि सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती.अशी असेल वाहतुकीवर बंदीमोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम ११५ अन्वये जिल्हादंडाधिकारी मंदार पत्की यांनी काढलेल्या आदेशानुसार, पुढील आदेशापर्यंत या मार्गांवरून रेती वाहून नेणाऱ्या सर्व ६ चाकी, १० चाकी व १२ चाकी टिप्पर आणि जड वाहनांना खालील वेळेत वाहतूक करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे:सकाळी: ८:०० ते ११:०० वाजेपर्यंतसायंकाळी: ४:०० ते रात्री ९:०० वाजेपर्यंतगर्दीच्या या वेळेत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना व नियमित प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, या निर्बंधांमधून रुग्णवाहिका, अग्निशामक दल व इतर अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना वगळण्यात आले आहे.नागरिकांची सुरक्षितता, रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवणे आणि जीवघेण्या अपघातांना आळा घालणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अवजड वाहनचालकांवर व मालकांवर पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत कडक दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *