‘ई-२०’ विरोधात गडकरी वाड्यावर मोर्चा; युवक काँग्रेसचा भडका!
पोलिसांनी मोर्चा रोखला; कार्यकर्ते ताब्यात, ‘निर्णय मागे घ्या, अन्यथा तीव्र संघर्ष’
नागपूर : केंद्र सरकारच्या ‘ई-२०’ इथेनॉल धोरणाविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने सोमवारी नागपुरात जोरदार शक्तीप्रदर्शन करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निवासस्थानावर धडक मोर्चा काढला. देवडिया काँग्रेस भवनासमोरून निघालेला मोर्चा चितिटणीस पार्क चौकात पोलिसांनी रोखून धरला. यामुळे पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये ओढाताण झाली. शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
देवडिया काँग्रेस भवन येथून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे, उपाध्यक्ष कपिल ढोके यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारच्या कथित जनविरोधी इथेनॉल धोरणाचा निषेध करत घोषणाबाजी केली. ‘ई-२०’ इथेनॉल धोरणामुळे वाहनधारक, मध्यमवर्गीय कुटुंबे आणि सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
मोर्चा चिटणीस पार्क चौकात पोहोचताच पोलिसांनी बॅरिकेट लावून व मोठा बंदोबस्त उभारून आंदोलनकर्त्यांना पुढे जाण्यापासून रोखले. त्यानंतर पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेत जबरदस्तीने पोलीस वाहनांमध्ये बसवून गणेशपेठ पोलीस ठाण्यात नेले.
नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी
१. जोरदार टीका: युवक काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत ‘ई-२०’ इथेनॉल धोरण हे जनहिताचे नसून, वाहनधारकांना आर्थिक अडचणीत ढकलणारे असल्याचा आरोप केला.
२. नैतिक जबाबदारीची मागणी: नागरिकांच्या हिताला धक्का देणाऱ्या या धोरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.
३. तीव्र आंदोलनाचा इशारा: जनविरोधी निर्णय मागे घेतला नाही तर राज्यभर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.
आंदोलनातील प्रमुख उपस्थिती
आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष अनुराग भोयर, सरचिटणीस रितेश पांडव, अभिषेक धवड, अक्षय हेटे, सुशांत लोखंडे, सागर चव्हाण, रौनक चौधरी, अनुष्का वानखेडे, आकाश गुजर, कौस्तुभ शिर्के, मेहुल आडवाणी, अभिजित ठाकरे, आयुषी देशमुख, रोमा चौधरी, रुबी पठाण, सुमंत कुऱ्हेकर, धीरज धकाते, विजया सावारकर, अक्षय डोर्लीकर, फझलूर कुरेशी, श्रीकांत ढोणे, अफजल बेरा, अजहर शेख, नयन तरवटकर, शंतनू धोटे, राजेश अद्दूर, रमीज शेख, नितेश राठोड, राहुल सुरकार, शिवराज शिंदे, अंकित हिवराळे, अमित दादगल, शुभम नागपुरे, संदीप रहांगडाले, मिथिलेश कन्हेंरे, सलामत अली, रजा अली, हेमंत कातुरे यांच्यासह राज्य, विभाग, जिल्हा व शहर स्तरावरील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले थे.
गडकरींच्या घराभोवती सुरक्षा कडे
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सकाळपासूनच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील घराभोवती बॅरिकेट लावून सुरक्षा कडे उभारले होते. या परिसरात कुणालाही प्रवेश दिला जात नव्हता. कोणी दाखल होण्याचा प्रयत्न केला तर पोलीस लगेच त्याची चौकशी करीत होते.

