चार महिन्यांपासून दहशत माजवणारी वाघीण अखेर जेरबंद
चार निष्पाप ग्रामस्थांचा घेतला होता बळी!
ताडोबाच्या आरआरटी (RRT) पथकाची पहाटे ३ वाजता धडक मोहीम
एटापल्ली (गडचिरोली) : एटापल्ली तालुक्यातील भामरागड वनविभागांतर्गत येणाऱ्या कसनसूर वनपरिक्षेत्रात गेल्या चार महिन्यांपासून दहशत माजवणाऱ्या आणि चार ग्रामस्थांचा बळी घेणाऱ्या ‘जी-२५ एसएएफ’ (G-25 SAF) या तीन वर्षीय नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला मोठे यश आले आहे. शुक्रवार, १३ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या रॅपिड रेस्क्यू टीमने (RRT) विशेष मोहीम राबवत डार्ट गनच्या साहाय्याने वाघिणीला बेशुद्ध करून पिंजऱ्यात कैद केले. वाघीण जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
जारावंडी राऊंडमधील वडसाकला बीटच्या कक्ष क्रमांक-१ मध्ये ही थरारक मोहीम पार पडली. या वाघिणीच्या सततच्या हल्ल्यांमुळे परिसरातील गावांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. ऐन हंगामात शेतात जाणे, धान कापणी करणे आणि जनावरे चारण्यासाठी जंगलाकडे जाणेही जिवावर बेतणारे ठरत होते. आता पकडलेल्या या वाघिणीला नागपूर येथील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात रवाना केले जाणार आहे. दरम्यान, परिसरात अद्यापही इतर वाघांचा वावर असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ताडोबाच्या पथकाने बजावली मोलाची भूमिका
डॉ. रविकांत खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली ही रेस्क्यू मोहीम अत्यंत काळजीपूर्वक राबविण्यात आली. पहाटे ३ वाजून २ मिनिटांनी शूटर अजय मराठे यांनी अचूक नेम साधत वाघिणीवर बेशुद्धीचे इंजेक्शन (डार्ट) डागले. वाघीण बेशुद्ध होताच पथकाने तिला सुरक्षितरीत्या ताब्यात घेऊन पिंजऱ्यात बंद केले. या यशस्वी मोहिमेत योगेश लाकडे, दीपेश टेंभुर्णे, वसीम शेख, विकास ताजने, प्रफुल्ल वाटगुरे, अमोल कोरपे, अक्षय दांडेकर आणि गुरुनानक ढोरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

