LatestNewsगोंदियाविदर्भ

सुफलाम कंपनीच्या रसायनयुक्त पाण्याने परिसराला समस्या

पिकांचे नुकसान, जनावरांचे आरोग्य धोक्यात
ग्रामस्थांचे उपविभागीय अधिकार्‍याला निवेदन
देवरी :
स्थानिक एमआयडीसी अंतर्गत उभारण्यात आलेली सुफलाम कंपनीच्या कारभाराने परिसरातील गावकरी अडचणीत आले आहेत. नियमांना वेशीवर टांगून कंपनीचा कारभार सुरू आहे. कंपनीकडून रसायनयुक्त वेस्टज पाणी भागी नाल्यात सोडले जात आहे. यामुळे परिसरातील पिकांवर त्यांचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. शिवाय नाल्याच्या पाण्यावर तहान भागविणारे जनावरे आजारी पडत आहे. यामुळे शेतकरी व पशुपालकांची चिंता वाढली आहे. या प्रकारामुळे परिसरातील शेतजमिनीची पोत व गुणवत्ता घसण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे यावर आळा घालण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या संदर्भात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
एम.आय.डी.सी. अंतर्गत सुफलाम कंपनी उभारण्यात आली. कंपनीचे कामही सुरू झाले आहे. परंतु, कंपनीचा कारभार परिसरातील गावकरी व शेतकर्‍यांना अडचणीत टाकत आहे. सुफलाम कंपनीकडून केमिकल (रसायन) युक्त पाणी शेजारी असलेल्या भागी नाल्यात सोडले जाते. रसायनयुक्त पाणी अंत्यत दुर्गंधीयुक्त असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. शिवाय शेतातील पिकांवर याचा परिणाम होत आहे. पाळीव जनावरे नाल्यातील पाण्यावर तहान भागवित असतात, यामुळे जनावरांचे आरोग्यावर परिणाम होवून जनावरे आजारी पडत आहेत. या संदर्भात प्रशासन व कंपनी व्यवस्थापनाकडे तक्रार करण्यात आली. परंतु, सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नाल्यालगत असलेल्या शेतकर्‍यांचे शेत जमीनीचे नुकसान होत आहे. विषारी पाण्यामुळे जमिनीचा पोत खालावत चालला आहे. भविष्यात नापिकीची वेळ शेतकर्‍यांवर येण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी या गंभीर प्रकाराकडे लक्ष देवून कंपनीकडून सोडण्यात येणारे रसायनयुक्त पाणी त्वरित बंद करावे, अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातून करण्यात आली आहे.
………………
ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारा
केंद्र शासनाच्या नियमानुसार प्रदूषित पाणी नदी नाल्यात सोडू नये हा नियम असतानासुद्धा कंपनीकडून नियमांना वेशीवर टांगून कामकाज केले जात आहे. सतत केमिकलयुक्त पाणी सोडले जात असल्याने परिसरातील पाणी दुषित होवून पिकांवरही परिणाम होत आहे. या संदर्भात वारंवार सूचना करूनसुद्धा कंपनीकडून आडमुठेपणाची भूमिका घेतली जात आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. आगामी काळात केमिकल युक्त पाणी सोडणे बंद झाले नाही तर कंपनीविरोधात आंदोलन करणार, असा इशारा भागी, गोटाबोडीसह परिसरातील गावकर्‍यांनी दिला आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *