LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

आंतरराज्यीय गांजा तस्करावर पोलिसांचा धाडसी सर्जिकल स्ट्राइक: ओडिशाहून मुंबईकडे चाललेला १९९ किलो गांजा जप्त!

१ कोटी ३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; सेंदूरवाफा टोलनाक्यावर मध्यरात्री थरारक कारवाई
साकोली (भंडारा) :
ओडिशा राज्यातून तब्बल १९९ किलोग्राम गांजा ट्रकमध्ये लपवून नागपूर, अमरावतीमार्गे मुंबईकडे वाहून नेणाऱ्या आंतरराज्यीय गांजा तस्करांच्या टोळीचा भंडारा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे साकोली जवळील सेंदूरवाफा टोलनाक्यावर पोलिसांनी मध्यरात्री सापळा रचून ही धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी १९९.५६० किलो गांजा आणि ट्रक असा एकूण १ कोटी ३४ लाख ७८ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला असून दोन अट्टल तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत.

केबलच्या बंडलांखाली लपवला होता गांजा!
२६ ते २७ जुलैच्या मध्यरात्री १२:४५ वाजताच्या सुमारास ही धडक कारवाई करण्यात आली. ओडिशाहून गांजा घेऊन WB 23 F 8785 क्रमांकाचा ५ ते ६ चाकी ट्रक रायपूर-राजनांदगाव-देवरी-साकोली राष्ट्रीय महामार्गावरून नागपूरच्या दिशेने जात असल्याची पक्की खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सेंदूरवाफा टोलनाक्यावर चोख सापळा रचला. ट्रक टोलनाक्यावर येताच पोलिसांनी तो अडवून पंचांसमक्ष कसून झाडाझडती घेतली. तस्करांनी गांजा लपवण्यासाठी मोठी हुशारी वापरली होती. ट्रकमध्ये वर केबलचे मोठे बंडल ठेवून त्याखाली गांजाच्या बांधलेल्या पिशव्या (चुंगड्या) लपवण्यात आल्या होत्या. सुरवातीला चालकाने उडवाउडवीची उत्तरे देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या खाक्यासमोर त्याची बतावणी टिकली नाही.
१.३४ कोटींचा मुद्देमाल हस्तगत; २ जण जेरबंद
तपासणीदरम्यान ट्रकमधून १९९.५६० किलो गांजा जप्त करण्यात आला, ज्याची बाजारपेठेतील किंमत सुमारे ९९ लाख ७८ हजार रुपये आहे. तर जप्त केलेल्या ट्रकची किंमत ३५ लाख रुपये असून एकूण मुद्देमाल १ कोटी ३४ लाख ७८ हजार रुपयांवर पोहोचला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे: १. पंकजकुमार भूषण यादव (वय ३०, रा. खुजहटिटा, मांजी, बिहार – ट्रक चालक) २. बापी बादल मातीक (वय ३८, रा. नवग्राम, पश्चिम बंगाल – वाहनमालक व क्लिनर)
तस्करीचे मुख्य रॅकेट कोणाचे?
या कारवाईत वाहनाचा मालक आणि क्लिनर असलेला बापी मातीक पोलिसांच्या हाती लागला आहे. मात्र, हा गांजा ओडिशातून नक्की कोणाकडून खरेदी करण्यात आला होता? मुंबईत हा माल कोणाला वितरित केला जाणार होता? आणि या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण? या सर्व प्रश्नांचा शोध घेऊन या तस्करांच्या मुळापर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.
पथकाला ३.५० लाखांचे विशेष रिवॉर्ड!
‘जागर नशामुक्त अभियान १.०’ अंतर्गत केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी साकोली उपविभागीय अधिकारी कार्यालयाला ३ लाख ५० हजार रुपयांचे विशेष पारितोषिक (रिवॉर्ड) जाहीर केले आहे. कारवाईनंतर पोलीस अधीक्षकांनी साकोली पोलीस ठाण्याला भेट देऊन संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेत पथकाचे कौतुक केले.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *