सर्राइत दोन गुन्हेगार महिनाभरासाठी तडीपार

डूगीपार पोलिसांची कारवाई
सडक अर्जुनी : रेती तस्करी, मारहाण असे विविध घटनात सहभागी असलेले दोन सर्राइत गुन्हेगारांना कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या उद्देशाने पोलिसांनी तडीपारची कारवाई केली आहे. या कारवाईला उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोरगाव यांनी शिक्कामोर्तब केले आहे. टिकेश उर्फ गोलू अशोक फुंडे (२९) रा.परसोडी, वसंतराव रामलाल पटले (३४) रा.पांढरी या दोघांवर महिनाभरासाठी गोंदिया जिल्ह्यातून हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे.
तालुक्यातील परसोडी येथील टिकेश उर्फ गोलु फुंडे हा सर्राइत गुन्हेगार आहे. याच्याविरूध्द अवैधरित्या रेती वाहतुक, तसेच शासकीय कर्मचार्यांवर हल्ला करणे, जप्त वाहन पळवून नेणे असे अनेक गुन्हे आहेत. तर पांढरी येथील वसंत पटले याच्याविरूध्द मारहाण करणे, दहशत पसरविणे असा आरोपाखाली गुन्हे दाखल आहेत. दोघांच्या कृत्यामध्ये कसलेही बदल घडून येत नसल्याने सणासुदीच्या दिवसात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी, या दृष्टीकोनातून डुग्गीपार पोलिसांकडून यांचा पुर्व इतिहास लक्षात घेत हद्दपार कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. अर्जुनी मोरगाव उपविभागीय अधिकारी यांनी दोन्ही गुन्हेगारांचा इतिहासात तपासून एक महिन्यासाठी गोंदिया जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डुग्गीपारचे ठाणेदार कृष्णा वनारे, पोहवा जगदिश मेश्राम, आशिष अग्निहोत्री, राकेश राऊत, प्रल्हाद खोटेले, अमिद नेवारे, महेंद्र सोनवाने, रंजित भांडारकर, उदेभान रूखमोडे आदिंनी केली.
०००००००